breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रात्रीच्या संचारबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील- राजेश टोपे

जालना |

राज्यात अधिक संसर्गदर असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत केंद्राने केलेल्या सूचनेच्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले. देशात करोना रुग्णवाढ असणाऱ्या केरळनंतर महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ नोंदविली जात आहे. त्याचप्रमाणे केरळ आणि महाराष्ट्रातील उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना गेल्या गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राजेश टोपे म्हणाले,की केरळमधील रुग्णवाढीचा अनुभव पाहता महाराष्ट्राने सावध होणे गरजेचे आहे.

पोळा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी इत्यादी सणांच्या निमित्ताने गर्दी होऊ नये यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. केंद्राने ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्य कृतिदल आणि आरोग्य विभागाचा करोना उपाय योजनांच्या संदर्भात सातत्याने संपर्क असतो आणि मुख्यमंत्री त्यासंदर्भात माहिती घेत असतात. राज्यातील लसीकरणासाठी अधिक मात्रा देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी १ कोटी १५ लाख मात्रा केंद्राने राज्यास दिल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख मात्रा उपलब्ध करवून देण्याबाबतचे पत्र केंद्राने राज्यास दिले आहे. प्रतिदिन अकरा लाख लसीकरण करण्याची क्षमता यापूर्वी राज्याने सिद्ध केलेली आहे. दररोज पंधरा ते वीस लाख लसीरकरणाची राज्याची क्षमता आहे, असेही टोपे म्हणाले.

  • ५ कोटी ३४ लाख चाचण्या

राज्यात रविवारी सकाळपर्यंत लसीच्या ५ कोटी ७० लाख ४४ हजार ९२० मात्रा देण्यात आल्या. शनिवापर्यंत राज्यात करोनाच्या ५ कोटी ३४ लाख ५६ हजार प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या. यापैकी जवळपास ६४ लाख ५२ हजार नमुने (१२.०७ टक्के) नमुने करोनाबाधित निघाले. यापैकी ६२ लाख ६० हजार रुग्ण (९७.०२ टक्के) करोनामुक्त झाले आहेत.

  • शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम

ज्या जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव राहिलेला नाही त्या ठिकाणी शाळा सुरू करता येतील का, याचा विचार राज्य कृतिदल करीत आहे. आरोग्य विभागाने अलीकडेच एक परिपत्रक काढले असून त्यानुसार येत्या पाच सप्टेंबपर्यंत राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दुहेरी लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. ही शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील पहिली पायरी आहे, असे टोपे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button