उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयातील पदनिर्मितीस राज्य सरकारची मान्यता
- १०० विद्यार्थिसंख्येसाठी ४४८ पदे निर्माण करणार
उस्मानाबाद |
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली होती. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक पदनिर्मितीच्या मान्यतेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वतंत्र आदेश काढून १०० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता ४४८ पदे चार टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी जिल्हावासीयांची मागणी होती. सत्ताधारी आणि विरोधकांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडे जोर लावला होता. त्याला यश मिळालेही, मात्र आवश्यक ती कार्यवाही आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या सर्व प्रतिपूर्तींसाठी कोणीही पाठपुरावा करीत नव्हते.
भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानंतर केंद्र सरकार व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आला. महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० खाटांचे रुग्णालय स्थापण करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने २७ जानेवारी रोजी मान्यता दिली होती. एवढेच नाही, तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट अ ते गट ड मध्ये एकूण ४४८ पदे निर्मिती करण्यास व भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या ९७.६० कोटी रुपयांच्या अंदाजित निधी खर्चास परवानगी देण्यात आली होती. या कार्यवाहीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही, असादेखील निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता कधी मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अखेर २७ मे रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चार टप्प्यात पदनिर्मितीस मान्यता दिली. तसा शासन आदेशही काढला आहे.