पालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/palika-school-67.jpg)
- तर साडेतीन हजार विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज: पालिकेकडून 23 हजार विद्यार्थिनींची तपासणी
पुणे – कोणाचे दात खराब आहेत, तर कोणाला डोळ्यांना दिसत नाही तर कोणाच्या शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता आहे. पालिकेने जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत पालिकेच्या 23 हजार विद्यार्थिंनींची आरोग्य तपासणी केली असून त्यातून एक हजार विद्यार्थिनींमध्ये रक्ताची कमतरता असल्याचे दिसून आले आहे.
पालिकेकडून जानेवारी ते मार्च महिन्यात या विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. याही शैक्षणिक वर्षात ही तपासणी केली जाईल. ज्या विद्यार्थिनींना चिकित्सेची गरज आहे त्यांना आम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
डॉ.अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी
पुणे महापालिका आरोग्य विभाग
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पालिकेच्या 76 केंद्रांवरील 307 शाळांमधील 23 हजार 336 विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन तसेच दात व डोळे तपाण्यात आले. त्यानंतर ज्या विद्यार्थिंनींना काही लक्षणे आढळली त्याप्रमाणे त्यांना तशी माहिती देण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अशा प्रकारची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी सांगितले.
शहरातील वानवडी, बिबवेवाडी, येरवडा, कर्वेनगर, भवानी पेठ, औंध, नगर रस्ता, घोले रस्ता, टिळक रस्ता, विश्रामबागवाडा आदी पालिकेच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थिनींची ही तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालानुसार 3 हजार 519 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. तर नेत्रतपासणीची गरज 1 हजार 178 विद्यार्थिनींना आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या विद्यार्थिंनीमध्ये 1 हजार 2 विद्यार्थिंनींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या विद्यार्थिनी या टिळक रस्ता परिसरातील आहेत. तर त्यापाठोपाठ विश्रामबाग वाडा परिसर व येरवडा परिसरातील विद्यार्थिंनीचा समावेश आहे. येरवडा भागातील 738 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. तर नगर रस्त्यावरील 561 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. कर्वेनगर परिसरात रहाणाऱ्या विद्यार्थिनींना डोळ्याचा त्रास असून 227 विद्यार्थिनींना नेत्रचिकित्सेची गरज आहे.