एकदा लागण झाल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/whatsapp-image-2020-05-08-at-10.08.42-2_202005416726.jpeg)
हाँगकाँगमध्ये एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या रुग्णांला दुसऱ्यावेळा कोरोना होत असल्याची जगातील पहिलीच केस पहायला मिळाली होती त्यानंतर , बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर काही रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आता भारतातही असं उदाहरण समोर आलं आहे. काही रुग्णांना एकदा संसर्ग होऊन बरं झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्यांचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता वाढली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील 54 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त होऊन बरी झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. 23 ऑगस्ट रोजी RT-PCR तपासणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. याआधी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही महिला कोरोनामुक्त झाली होती.
डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, कदाचित एकदा लागण झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं उदाहरण असू शकतं. रतन रुग्णालयात महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञनेश वोरा यांनी सांगितलं की, ‘या प्रकरणात महिलेला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याचं दिसत आहे. चार महिन्यांपर्यंत या महिलेला कोणत्याही समस्या उद्भवल्या नव्हत्या. परंतु, चार महिन्यांनी महिलेत पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं दिसून आली. याआधी महिलेचा रिपोर्ट दोन वेळा नेगेटिव्ह आला होता.’
वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणू पासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रीअॅक्टिव्हेशन) असे म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. मात्र हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुण्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात.
“दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे प्रकरण अत्यंत्य दुर्मिळ असे आहे. त्यामुळे तो गंभीर आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.. विशेष म्हणजे यामध्ये दोन तीन शक्यता वर्तविण्यात येऊ शकतात. पहिली शक्यता ती अशी कि, दुसऱ्यांदा चाचणी पॉझिटिव्ह येत असेल तर जुन्याच विषाणूचे मृत अवशेष त्या चाचणीमध्ये आढळले जाऊ शकतात. दुसरं म्हणजे जुनाच संसर्ग पुन्हा झाला आहे किंवा एखादा विषाणू कुठे सुप्त अवस्थेत आतडयामध्ये असेल तो पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे विशेष असे घाबरण्याचं अजिबात कारण नाही. यासाठी पुन्हा एकदा सिटी स्कॅन करून बघणे जर काही फुफ्फुसांवर बदल दिसत असतील तर त्या प्रमाणे उपचार करणे. त्यामुळे एखादा जुना संसर्ग होणे याला फार तर रीऍक्टिव्हेशन म्हणू शकता मात्र रीइन्फेक्शन त्याला म्हणता येणार नाही. असे डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात, डॉ कुलकर्णी हे पुणे येथील के इ एम रुग्णालयात श्वसनविकार तज्ञ आहेत.
मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे यांच्या मते कोरोना हा संसर्गजन्य आजार आणि त्यास कारणीभूत ठरणारा विषाणू सगळ्यांसाठीच नवीन आहे. ते पुढे सांगतात कि, सुरवातीलाच या विषाणूच्या काही 11 उपजाती असल्याचे म्हटले होते. ज्या काही पुन्हा कोरोनाच्या चाचण्या पॉजिटीव्ह असल्याच्या केसेस आढळून येत आहेत. त्या एक तर एखाद दुसरी अशीच आहे, त्यावरून आता पुन्हा कोरोना होतो हा निष्कर्ष काढणे कठीण आहे. मला वाटत नाही आपल्याकडे काही केसेस असतील, जर एखाद दुसरी संशयास्पद केस असेल तर त्या रुग्णाच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करून घेतले पाहिजे. यामधून त्यांच्या विषाणूमध्ये काही बदल आढळतात का हे पहिले पाहिजे. त्यांनतर पुढचा निष्कर्ष काढणे योग्य राहील. यापुढे अशा व्यक्तीचा एक डेटा ठेवून काही विषाणूंमध्ये कोणते जनुकीय बदल दिसतायेत का यावर लक्ष ठेवले पाहिजे. “
तर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात कि, ” सध्या तरी महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयात असे दुसऱ्यांदा कोरोना झालेले कोणतेही रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र कोरोनाच्या उपचारानंतर जर त्यांना काही आणखी त्रास होत असेल तर त्या करिता काही रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आले आहे. काहीवेळा जुना संसर्ग बळावू शकतो त्याला रीऍक्टिव्हेशन म्हणू शकतो. मात्र सध्याच्या घडीला आपल्याकडे रीइन्फेक्शनची कोणतीही केस नाही.”
त्यामुळे आता मला कोरोना होऊन गेलाय, आता या आजाराविरुद्ध लढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती पेशी म्हणजे अँटीबॉडीज शरीरात निर्माण झाल्या आहेत. आता आपल्याला काही पुन्हा कोरोना होणार नाही. या भ्रमात असाल तर नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. कोरोना मुक्त व्यक्तींनीही शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. मात्र राज्यात आणि मुंबईत सध्या तरी असे कोणतेही प्रकरण आढळले नसल्यामुळे घाबरण्याची गरज नाही.