Maharashtra Rain : पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
पुणे : राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. रविवारी ८ ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा काही भाग वगळता इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा – ‘मोदींचीच शिवसेना खरी असे..’; ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!
नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.