breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Ground Report। पिंपरी-चिंचवडमध्ये मतांच्या आकडेवारीत महायुतीच ‘आघाडी’वर!

लोकसभा निवडणुकीतील मिळालेल्या मतांमध्ये सरशी : महाविकास आघाडीला आणखी मेहनत करण्याची गरज

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. राज्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला असला, तरी शहरात अद्याप महायुतीला तुलनात्मक आकडेवारीमध्ये मताधिक्य आहे. त्यामुळे ‘इंडिया आघाडी’ला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. यापैकी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४ लाख ७ हजार ४३ मते मिळाली आहेत. तसेच, महाविकास आघाडीला ३ लाख ५८८५ मते मिळाली आहे. आकडेवारीची गोळाबेरीज केली असता महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा एकूण १ लाख १ हजार ६८ मतांधिक्य महायुतीला मिळाले आहे. 

चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपा आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे वर्चस्व आहे. या मतदार संघामध्ये महायुतीला ७४ हजार ७६५ मतांची आघाडी आहे. तसेच, पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे वर्चस्व आहे. या मतदार संघामध्ये महायुतीला १६ हजार ७३१ मतांचे लीड मिळाले आहे. यासह भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी महायुतीला ९ हजार ५७२ मतांची आघाडी आहे. 

… असा आहे महायुतीचा ‘क्लेम’

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत १२८ पैकी ११५ पेक्षा जास्त नगरसेवक भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, सध्यस्थितीला महायुतीकडे स्थानिक पातळीवर प्रभाव ठेवणारे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत वर्चस्व ठेवण्यासाठी ताकदीने मैदानात उतरणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि त्यामुळे निर्माण झालेला उत्साह आगामी काळात महायुतीपुढे आव्हान निर्माण करणारा आहे. चिंचवड, पिंपरी आणि भोसरीत मताधिक्य असल्यामुळे जागावाटपाच्या चढाओढीत विद्यमान आमदारांसह त्यांच्या पक्षाचा मतदार संघावरील  ‘क्लेम’ कायम राहणार आहे. 

महापालिका इच्छुकांना ‘रिझल्ट’ द्यावा लागणार… 

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यांत महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ‘रिझल्ट’ द्यावा लागणार आहे. किंबहुना, लोकसभा निवडणुकीत ‘‘दिवसा एक पक्ष आणि रात्री एक पक्ष’’ अशी दुटप्पी भूमिका घेतल्यास इच्छुकांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या महत्त्वाकांक्षी स्थानिक इच्छुकांनी सावध वाटचाल करण्याची भूमिका ठेवली आहे. अन्यथा ना इकडचा… ना तिकडचा… अशी द्विधा स्थिती होण्याची चिन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button