विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक ः डॉ.जब्बार पटेल
![Various Subjects, Universal Dimension, Cinema, Dr.Jabbar Patel,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-4-1-780x470.png)
पिंपरी : राजकारण, समाजकारण, स्त्री-पुरुष संबंध, उद्योग-व्यवसाय अशा विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे. तरच, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले. चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सांगवीतील निळूभाऊ फुले रंगमंदिरात दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते व लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी विविध विषयावर त्यांना बोलते केले.
यावेळी भाजप नेते शंकर जगताप, लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे आदी उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीच्या आजपर्यंतच्या प्रवासातील विविध टप्प्यांवर डॉ. पटेल आणि नखाते यांनी भाष्य केले.
डॉ. पटेल म्हणाले की, सिंहासन, सामना अशा चित्रपटातील विषय आणि त्यातील सिद्धांत आजही काही प्रमाणात दिसतात. मात्र जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही. विश्वातील लोकशाहीचे धागे आणि त्याची मुळे आपल्या लोकशाहीत शोधून वैश्विक परिमाण देणारा सिनेमा आला पाहिजे. राजकारणाबरोबरच स्त्री पुरुष नातेसंबंध, समाजकारण, उद्योग व्यवसाय आदी विविध विषयांबाबतही वैश्विक परिमाण शोधणे आवश्यक आहे, तोपर्यंत भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळणार नाही. चित्रपट हा इतिहासाचा साक्षीदार असतो. तो त्या काळातला ऐतिहासिक दस्ताऐवजही ठरतो. त्यामुळे बदलते जग आणि वास्तवाचे भान हे चित्रपटात उतरले पाहिजे. चित्रपटाच्या या चौकटीत संपूर्ण जग असते.
डॉ. पटेल म्हणाले की, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे समर नखाते यांना गुरू मानतात. गुरू वाट दाखवतो, परंतू, पुढची वाटचाल शिष्यालाच पार पाडावी लागते. समर नखाते माझे पहिले गुरू आहेत. सामना चित्रपट करताना मी अगदीच नवखा होतो, सिनेमाचे तंत्र त्यांनी मला सांगितले. निळूभाऊ फुले हे माझे परममित्र होते. त्यांच्यासारखा नम्र माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहात येऊन आनंद वाटला. आमच्या निळूभाऊंचे नाव या रंगमंदिराला दिल्याबद्दल मी पिंपरी-चिंचवडकरांचे आभार मानतो.
समर नखाते म्हणाले, चित्रपटासाठीचे तंत्रज्ञान आता सर्वत्र आहे. पण केवळ तंत्रज्ञानाने भागत नाही, तर सिनेमाची एक वेगळी भाषा असते. सिनेमा केवळ चित्र दाखवत नाही, तर माणूसपणाची कक्षा विकसित करतो. भारतात प्रादेशिक चित्रपट समृद्ध आहेत, त्यातून भारतीय संवेदना, अविष्कार जगभरात पोहोचायला हवा. तंत्र आणि मांडणीपेक्षाही अभिव्यक्ती पडद्यावर काय येते हे महत्त्वाचे आहे.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, मनोरंजनाचे पूर्णपणे पॅकेज असलेला टीडीएम हा मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रेक्षकांची साथ हवी आहे. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास नवनवे मार्ग सापडत जातात व प्रश्न सुटत जातात. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते.