सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
![The High Court rejected the petition of Sushant Singh Rajput's father](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Sushant-Singh-proud-of-Savdhaan-India-2-journey.jpg)
नवी दिल्ली – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी सुशांतच्या बायोपिकविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायाधीश संजीव नरुला यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूवर आधारित ‘न्यायः द जस्टिस’ या चित्रपटावर स्थिगिती आणण्याची मागणी सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी केली होती. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून अनेक तर्क वितर्क लढवले जात असून अनेकजण वेगवेगळ्या कथा रचत आहेत. यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात आहे’, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर न्यायः द जस्टिस या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्यात आला असून यात त्याचे नाव, करिअर आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. अनेकजण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत असे आरोप करत या वर्षाच्या सुरुवातीला सुशांतच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२१ रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडसह संपूर्ण देश हादरून गेला होता. सध्या या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे.