‘द कॉन्जुरिंग’च्या चौथ्या भागाचे भारतात अक्षरश: धुमाकूळ
प्रेक्षकांचा भीतीने उडतोय थरकाप; ‘द कॉन्जुरिंग 4’ची छप्परफाड कमाई

मुंबई : ‘द कॉन्जुरिंग’ या हॉरर चित्रपटाचा चौथा भाग गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. पॅरानॉर्मल एक्स्पर्ट्स आणि वॉरेन जोडप्याच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित हा हॉरर चित्रपट आहे. प्रेक्षकांना अभूतपूर्व थराराचा अनुभव देण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. भयपटांबाबत अजूनही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे, हे या चित्रपटाच्या कमाईवरून सिद्ध होतंय. ‘द कॉन्जुरिंग युनिव्हर्स’मधील पहिला चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘द कॉन्जुरिंग: लास्ट राइट्स’ या चौथ्या भागात हॉररचा स्ट्राँग डोस असून प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय.
या चित्रपटात वॉरेन दाम्पत्याची कथा दाखवण्यात आली आहे. लॉरेन (वेरा फार्मिगा) गरोदर असते आणि एड (पॅट्रिक विल्सन) एका भूताटकी आरशासमोर येण्यापासून वाचतो. परंतु त्याची काळी सावली त्यांच्या मुलीवर पडते, जी लॉरेनच्या पोटात वाढतेय. जेव्हा जूडीचा (मिया टॉमलिंसन) जन्म होतो, तेव्हाच ती मृत्यूला स्पर्श करून परत येते. ती जसजशी मोठी होते, तसतसे तिला भीतीदायक स्वप्न पडू लागतात. भूताचा आरसा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यासोबत भयानक घटना घडू लागतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते, तेव्हा वॉरेन दाम्पत्य त्यांच्या मदतीला पुढे येतात.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात 15.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 50.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, हा आकडा 500 कोटींच्या पार पोहोचला आहे. लवकरच हा आकडा 700 कोटींचाही टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं बजेट तब्बल 484 कोटी रुपये असल्याचं कळतं. पहिल्याच दिवशी त्याची 573 कोटी रुपयांची कमाई झाली.
या चित्रपटातील भारतातील कमाई ही त्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत अधिक आहे. इतर चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ‘बागी 4’ने पहिल्या दिवशी 12 कोटी रुपये, ‘दिल मद्रासी’ने 13.1 कोटी रुपये, ‘घाटी’ने 2 कोटी रुपये, ‘लिटिल हार्ट्स’ने 1.32 कोटी रुपये आणि ‘द बंगाल फाइल्स’ने 1.75 कोटी रुपये कमावले आहेत.