ताज्या घडामोडीमनोरंजनविदर्भ

‘पावका’च्या साहसी खेळात मुले दंग

पावका म्हणजे जंगलातील सरळ वाढणाऱ्या झाडांच्या लाकडी दांडय़ाला दिलेला एक विशिष्ट आकार होय.

अकोले | भंडारदरा पाणलोट क्षेत्रात भटकंती करणाऱ्या पर्यटकांना दोन उंच काठय़ांवर विशिष्ट उंचीवर उभे राहत तोल सांभाळत त्या काठय़ांच्या साह्य़ाने पावले टाकत चालत जाणारी मुले हमखास दिसतात. या आगळ्या खेळात ती मुले दंग असतात. उपलब्ध संसाधनांचा वापर करीत खेळला जाणारा हा वैशिष्टय़पूर्ण खेळ म्हणजे पावका.

भंडारदरा धरणाच्या पश्चिम दिशेला वसलेल्या पांजरे, उडदावणे, घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, मुतखेल, मुरशेत या आणि इतर आदिवासी गावांमधे पावका घेऊन मुले मोठय़ा प्रमाणावर खेळताना आपल्याला दिसतात. या खेळाची मजा घेताना मुले आपले देहभान विसरून निसर्गाच्या कुशीत अलगदपणे रममाण होत असतात.

पावका म्हणजे जंगलातील सरळ वाढणाऱ्या झाडांच्या लाकडी दांडय़ाला दिलेला एक विशिष्ट आकार होय. ज्या दांडय़ाला पाय ठेवण्यासाठी जागा असते. जंगलात वाढणाऱ्या सरळ आणि काटक व वैशिष्टय़पूर्ण आकाराच्या झाडांच्या बहुदा सागाच्या फांद्या यासाठी वापरल्या जातात. ज्याच्यावर पाऊल ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जागा तयार केलेली असते.

या खेळामध्ये मुले आपल्याला पेलतील अशा आकाराचे दोन लाकडी दांडे निवडतात व त्याला एक सारखे करून पाऊल ठेवण्यासाठी जागा बनवतात. या बनवलेल्या जागेवर आपली छोटीशी पावले अलगद ठेवून एका ठरावीक उंचीवर चालण्याचा आनंद घेतात. पावक्यावर चालताना आदिवासी मुलं अत्यंत कुशलतेने व आत्मविश्वासाने आपली पावलं टाकत असतात. या खेळामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो शरीराचा तोल सांभाळणे. आदिवासी मुलं खास करून आदिवासी ठाकर समाजाची मुलं हा तोल सांभाळण्यात निपुण आहेत. पावक्यावर विराजमान होऊन अत्यंत डौलात निसर्गात मजा घेत मुले हा खेळ खेळतात. सध्या या भागामध्ये करोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरीच असतात. त्यामुळे हा खेळ खेळताना जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा मुले दिसत असतात. निसर्गाच्या कुशीत वाढलेली ही मुले अत्यंत कुशलतेने निसर्गातील विविध घटकांचा वापर करून आपले खेळ खेळत असतात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे पावका होय. कदाचित हा पावका या मुलांना जीवनात नेहमी उंचीवर जाण्याची प्रेरणा देत असावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button