महेश मांजरेकरांवर अटकेची तलवार; दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
![Sword of arrest on Mahesh Manjrekar; High Court refuses to grant relief](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Mahesh-Manjrekar-Actor.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
‘नाय वरण भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवर्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा व कारवाईला स्थगिती द्यावी यासाठी महेश मांजरेकरांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने मांजरेकर यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत तपास सुरु असताना त्याला स्थगिती देऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही दिलासा दिला नाही. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मांजरेकरांवर अटकेची टांगती तलवार असून याप्रकरणी पुन्हा सोमवारी सुनावणी होणार आहे.
14 फेब्रुवारीला हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अॅड. प्रकाश साळसिंगकर यांच्यामार्फत माहिम पोलीस ठाण्यात कलम 292, 34 तसेच पोस्को कलम 14 आणि आयटी कलम 67 व 67 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने माहिम पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. महेश मांजरेकर यांनी पॉक्सो आणि आयटी कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. तसेच नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने अटकेपासून संरक्षण द्यावे असेही त्यांनी याचिकेत म्हटले होते. पण कोर्टाने त्यांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाने महेश मांजरेकरांना नियमित कोर्टाकडे दाद मागण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुन्हा सोमवारी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.