Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सयाजी शिंदेंचा पूरग्रस्तांना ‘सखाराम बाइंडर’ नाटकाच्या माध्यमातून मदतीचा हात

50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं 'सखाराम बाईंडर' नाटक पुन्हा रंगभूमीवर

मुंबई : नाटक म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. ही सामाजिक बांधिलकी जपत, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी ‘सखाराम बाइंडर’ या गाजलेल्या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा एक मोठा हात दिला आहे. सुमुख चित्र निर्मित या नाटकाचा दिल्लीतील शुभारंभाचा प्रयोग नुकताच हाऊसफुल्ल पार पडला. निर्माते मनोहर जगताप (CEO, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज) आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे या नाटकाला भक्कम कलाकारांची जोड मिळाली आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबतच नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कसलेले कलाकार या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले असून, संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार
दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी यावेळी दिली. या सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ एक रुपया मानधन घेऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल.

“मी आयुष्यात परत नाटक करेन असं मला वाटलं नव्हतं. हे नाटक अत्यंत जिवंत, कालातीत आणि सुंदर आहे. म्हणून ते मला करावंसं वाटलं. महाराष्ट्रात पुरामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या नाटकातून जो नफा कमावला जाईल, तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील दहा प्रयोगांचं मानधन मी घेणार नाही. तेसुद्धा पूरग्रस्तांसाठी दिलं जाईल”, असं सयाजी शिंदे म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदे केवळ एक रुपये मानधनावर हे विशेष प्रयोग करत आहेत. कला आणि माणुसकीच्या या अनोख्या संगमाचे साक्षीदार होण्यासाठी पुढील प्रयोगांना अवश्य उपस्थित राहावे. कलाकार आणि निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा असून, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button