सैफ अली खान जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला भेटला
भजनसिंग राणाच्या सेवेबद्दल कौतुक करून त्याला 11,000 रुपयांचे बक्षीस
मुंबई : सैफ अली खानवर झालेला हल्ल्यानंतर बऱ्याच घटना घडल्या. हा हल्ला, ही घटना सर्वांसाठीच अगदी अनपेक्षित होती. पण आता सैफची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्जही मिळाला आहे. मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा सैफ हॉस्पिटलमधून घरी पोहोचला तेव्हा त्याने पापाराझींना पोज दिली आणि हॅलो देखील केला.
सैफवर हल्ला झाला तेव्हा पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या, आताही अनेक नवीन खुलासे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या आरोपीकडून होताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये जास्त चर्चा जर कोणाची झाली असेल तर ती एका रिक्षाचालकाची. तोच रिक्षाचालक ज्याने जखमी सैफला रुग्णालयात नेलं होतं.
सैफला लिलावतीमध्ये ऍडमिट केल्यानंतर या ऑटोचालकाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले. तेव्हा त्याच्याकडूनही त्यावेळी सैफची नक्की अवस्था कशी होती हे देखील समजले. त्या घटनेनंतर त्या ऑटो चालकाचे अनेकांनी कौतुकही केलं. आता सैफनं स्वत: या ऑटोचालकाला भेटायला बोलावलं होतं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सैफ अली खानने ऑटो चालकाची भेट घेतली
ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणासोबत सैफच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटो पाहता, सैफ मंगळवारी हॉस्पिटलमध्येच ऑटोचालकाला भेटला होता हे लक्षात येतं. सैफने ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या शेजारी बसून फोटो काढले आहेत. दरम्यान या दोघांमध्ये यावेळी संभाषणही झालं.
सैफ आणि ऑटोचालकामध्ये काय संभाषण झालं?
ऑटो चालक भजन सिंग राणाने सांगितले की “मला सैफच्या पीएचा दोनवेळा फोन आला. त्यांनी भेटायला बोलवलं म्हणून मी गेलो. सैफ तेव्हा रुग्णालयातच होता. मी गेल्यानंतर आधी त्यांच्या पाया पडलो तसेच त्यांचं सगळं कुटुंब तिथे उपस्थित होतं. त्यांच्या आई शर्मिला टागोरही तिथे होत्या मी त्यांच्याही पाया पडलो.
सगळेजण माझे आभार मानत होते. सैफ यांच्या आईंनी ही हात जोडून माझे आभार मानले. पण सैफला बरं झालेलं पाहून मला फार आनंद झाला” असं म्हणत ऑटो चालकाने थोडक्यात भेटीचा प्रसंग सांगितला.
सैफने ऑटो चालकाची भेट घेऊन त्याचे आभार मानले
दरम्यान सैफने ऑटो चालकाची भेट घेऊन त्याचे आभार मानले. असेच नेहमी इतरांना मदत करण्याचं त्याला प्रोत्साहनही दिलं. सैफ अली खानने रिक्षाचालकाच्या कामाचे कौतुक केलं. एवढच नाही तर त्यादिवशी सैफला रुग्णालयात पोहोचवल्यानंतर ऑटोचालकाने त्याच्याकडून पैसे घेतले नव्हते त्यामुळे त्यादिवशीचे पैसे नक्की तुम्हाला मिळतील असं आश्वासनही दिलं.
तसेच आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला लक्षात ठेवा असं मैत्रीपूर्ण विश्वासही सैफनं भजनसिंगला दिल्याचं त्याने म्हटलं.
ऑटोचालकाने सैफकडून पैसेही घेतले नव्हते.
भजन सिंग राणाने त्या रात्रीचा संपूर्ण प्रकार सांगताना म्हटलं की, ‘सैफच्या मानेतून रक्त येत होते. त्याचे सर्व कपडे रक्ताने माखले होते. खूप रक्त कमी झाले होते. तो स्वतः माझ्याकडे चालत आला, त्याच्यासोबत एक लहान मूलही होते. मला त्याला पटकन दवाखान्यात न्यावे लागले. आठ-दहा मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मी तिथे गेलो आणि तेव्हा मला समजले की तो सैफ अली खान आहे.”
“पण त्यावेळी त्याची अवस्था प्रचंड वाईट होती आणि त्याचा कुर्ता पुर्ण रक्ताने माखला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात पोहोचवणं आणि त्याच्यावर उपचार होणं माझ्यासाठी फार गरजेच होतं” अस म्हणत ऑटोचालकाने त्यावेळी पैशांचा विचार न करता किंवा पैसे न मागता सैफला रुग्णालयात पोहचवून निघून गेल्याचं त्याने सांगितलं.
भजनसिंगच्या कामाची दखल अन् 11,000 रुपयांचे बक्षीस
भजनसिंगच्या कामाची दखल एका संस्थेने मात्र नक्कीच घेतली. एका संस्थेने ड्रायव्हर भजनसिंग राणाच्या सेवेबद्दल त्याचं कौतुक करून त्याला 11,000 रुपयांचे बक्षीस दिले आहे.तसेच त्याचा सन्मानही केला. माणसापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही असं म्हणणाऱ्या त्या ऑटोचालकाचं नक्कीच सर्वत्र कौतुक होत आहे.
भजनसिंग राणा उत्तराखंडचे रहिवासी असून मुंबईत अनेक वर्षांपासून ऑटो चालवत आहेत. अभिनेत्याला रुग्णालयात नेल्यानंतर तो चर्चेत आला. सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.
मुंबई पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी बोलावून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली होती.आता सैफ आणि त्याच्या कुटुंबानं भजनसिंगच्या कामाची दखल घेत त्याची भेट घेतल्यानंतर तर अजूनच त्याचे कौतुक होत आहे. शिवाय या दोघांचे फोटोही व्हायरल होत आहेत.