breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मुस्लिमांना शिक्षणापेक्षा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची जास्त चिंता’; अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचं विधान चर्चेत

Naseeruddin Shah | अभिनेते नसिरुद्दीन शाह हे अभिनयासोबतच त्यांच्या परखड भाष्यासाठी परिचित आहेत. विविध मुलाखतींमध्ये ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर मोकळेपणे व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. देशात धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी यात देशातील मुस्लिमांचीही चूक असल्याचं मत मांडलं.

नसिरुद्दीन शाह म्हणाले, मोदींना विरोध करणं फार सोपं आहे. देशात जे काही चुकीचं चाललंय, त्यासाठी मोदींना दोष देणं फार सोपं आहे. पण मोदी सत्तेत येण्याआधीही या देशात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत्या हे वास्तव आहे. भारतात भिन्न धर्मीयांमध्ये छुप्या स्वरुपात नकारात्मक भावना होत्याच. मला लहानपणी मुस्लीम असल्याबाबत हेटाळणीचा सामना करावा लागला होता. मीही इतरांना त्यांच्या धर्मावरून चिडवायचो. मला वाटतं या प्रकारच्या भावना या देशात कायम छुप्या स्वरुपात होत्या. मोदींनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यात हुशारी दाखवली.

धर्मनिरपेक्षता किंवा समानतेचे जे काही उरले-सुरले अवशेष शिल्लक होते, ते उद्ध्वस्त करण्याची संधीच यामुळे उपलब्ध झाली. याआधी आपण सुखी आणि समृद्ध होतो, सगळं काही चांगलं होतं असे जे काही दावे केले जातात ते चुकीचे आहेत. तशी परिस्थिती नव्हती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं चित्र चित्रपटांमधून किंवा गाण्यांमधून उभं केलं जायचं. ते तसं व्हावं यासाठीचा तो एक प्रयत्न होता. पण मला वाटत नाही की देशानं त्याचा स्वीकार केला आहे. फक्त काहींनी स्वीकार केला. त्यामुळे ही गाणी म्हणजे फक्त शब्दच्छल होता, असं नसिरूद्दीन शाह म्हणाले.

हेही वाचा   –      शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने फळपीक विम्याची मुदत वाढवली 

माझ्या सहा पिढ्या या देशात संपल्या, या देशानं मला प्रेम करायला शिकवलं. पण काही प्रसंगी मला हा देश काही वेगळाच वाटला. सत्य हे आहे की मुस्लिमांनीही कधी या गोष्टींची तक्रार केली नाही. मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे. त्यांनी शिक्षणाविषयी काळजी करायला हवी. त्यांनी मुलांना आधुनिक गोष्टींचं प्रशिक्षण द्यायला हवं. मदरशांमध्ये मुलांना ठेवून त्यांना कायम धार्मिक गोष्टींचं शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी मुलांना आधुनिक शिक्षण द्यायला हवं. ही मुस्लिमांची चूक आहे, असं नसरूद्दीन शाह म्हणाले.

मुस्लिमांना विरोध करणारे मोदी पहिलेच नाहीत. त्यांनी फक्त योग्य संधी साधली. मुस्लीम लीगला प्रतिक्रिया म्हणून १९१५ साली हिंदू महासभा स्थापन झाली. दोनं बंगाली गृहस्थांनी २०व्या शतकात पहिल्यांदा द्विराष्ट्रवादावर बोलायला सुरुवात केली. हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकत नाहीत या गृहीतकावर हे आधारित होतं. पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यानं हे खोटं ठरवलं. हिंदू, मुस्लीम आणि इतर सर्व धर्म स्वातंत्र्यलढ्यात एकत्र लढले. कदाचित ती शेवटची वेळ होती जेव्हा हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये संपूर्ण एकोपा दिसून आला होता. मोदींनी फक्त लोखंड गरम असताना त्यावर घाव घातला. त्यांनी एका कार्यक्रमात स्कलकॅप घालण्यास नकार दिला होता. ते विसरणं कठीण आहे. पण जर त्यांनी स्कलकॅप घातली तर त्यातून हा संदेश असेल की मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही. आपण दोघे या देशाचे नागरिक आहोत. जर त्यांना या देशाच्या मुस्लिमांना आपलंसं करायचं असेल, तर या कृतीचा त्यांना फायदा होऊ शकेल. कदाचित यातून हे दिसून येईल की त्यांनी मुस्लीमदेखील या देशाचे नागरिक आहेत, या वास्तवाचा स्वीकार केला आहे, असंही नसरूद्दीन शाह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button