KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन
इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा शोक, बेंगळुरूमधील रुग्णालयात अखेरचा श्वास
मुंबई : गेल्या महिन्याभरात फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गजांचे निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आताही अशीच एक दु:खद बातमी समोर आली आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF’ मधील प्रसिद्ध पात्राचं आणि प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झालं आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट “KGF” मधील प्रसिद्ध चाचा अभिनेते हरीश राय यांचे निधन झाले आहे. त्यांनी बेंगळुरूमधील किडवाई रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
हरीश हे गेल्या अनेक वर्षांपासून थायरॉईड कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र शेवटी त्यांची कर्करोगाशी असलेली झुंज संपली. हरीश यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; सखोल चौकशी करण्याचे आदेश
अभिनेते कर्करोगाने ग्रस्त होते
हरीश राय गेल्या काही वर्षांपासून थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त होते. अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गोपी गौडू यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर केला, ज्यामध्ये हरीश राय यांनी स्वतः स्पष्ट केले की कर्करोग त्यांच्या पोटापर्यंत पसरला आहे तसेच त्यांच्या पोटात पाणी साचल्यामुळे त्यांचे पोट सुजले आहे. शिवाय, कर्करोगामुळे ते अशक्त आणि कमकुवत झाले होते.
उपचारासाठी पैसे नव्हते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला हरीश राय यांच्याकडे उपचारांसाठी पैशांची कमतरता होती. या व्हिडिओमध्ये त्यांनी उघडपणे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. ज्यामुळे निर्माते उमापती श्रीनिवास, दर्शनचे चाहते आणि अभिनेता यश यांच्यासह अनेक लोक त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले होते. हरीश राय यांनी सांगितले की, केजीएफ स्टार यश यांनी सर्वप्रथम त्यांची मदत केली. दरम्यान हरीश यांच्या जाण्याने सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे.
हरीश राय यांच्या कामाबद्दल
हरीश राय हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते, त्यांनी ‘ओम’, ‘नल्ला’, ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शोक व्यक्त केला
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अभिनेत्याचा फोटो शेअर करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक हरीश राय यांचे निधन खूप दुःखद आहे. त्यांनी ओम, हॅलो यमा, केजीएफ आणि केजीएफ 2 सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करावे अशी प्रार्थना करतो.”




