गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक, अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी
गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार?

मुंबई : गौतमी पाटील बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे घडलेल्या अपघात प्रकरणात आता गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने, घडलेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता. तर वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने चौकशी करण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी बजावली गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सामाजी विठ्ठल मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
तर या अपघातानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे. दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणी आता गौतमी पाटीलला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे, असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर दुसरीकडे गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे तपास योग्यरित्या होत नसल्याचा आरोप या अपघातामधील जखमी झालेल्या रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रिक्षा चालकावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढंच नाहीतर जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी असाही आरोप केला आहे की, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीही बदलला आहे.