ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मीकांत बेर्डे तुफान नाचायचा

ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण सांगितली

मुंबई : गिरगावातील खेतवाडी, कुंभारवाडा अशा मराठी संस्कृती, मूल्ये, परंपरा जपलेल्या अथवा वाढलेल्या वस्तीत लक्ष्मीकांत बेर्डे लहानाचा मोठा झाला. खेतवाडीतील युनियन हायस्कूलचा आणि मग गिरगाव चौपाटीवरच्या भवन्स कॉलेजचा तो विद्यार्थी. आणि त्यातच गिरगावात जबरदस्त सण संस्कृती! मकर संक्रांतपासून दत्त जयंतीपर्यंत सगळे लहान मोठे सण गिरगावात साजरे होण्याची परंपरा खूपच जुनी. त्यात प्रत्येक लहान, मोठ्या, चिंचोळ्या, आडव्या गल्लीत सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची जबरा धूम. आणि प्रत्येक मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे जबरदस्त कच्ची बाजा.

अतिशय धूमधडाक्यात प्रत्येक मिरवणूक निघण्याची परंपरा आजही कायम आहे. अशा सामाजिक, सांस्कृतिक, सणवारी वातावरणात लहानाचा मोठा होत जाताना लक्ष्मीकांत अर्थात आपला लक्ष्या बेर्डे यात मनसोक्त मनमुराद नाचायचाच. प्रत्येक वर्षी त्याचा हा आनंद सोहळा अगदी ठरलेला. तो काय करायचा माहित्येय? तो प्रार्थना समाज ते आॅपेरा हाऊस असा नाचत नाचत जाई आणि मग पुन्हा माघारी येई आणि प्रार्थना समाजला बघायचा की कोणत्या मिरवणूकीत चांगला कच्ची बाजा आहे, त्यातून तो पुन्हा ऑपेरा हाऊसपर्यंत जाई. पुन्हा माघारी येई आणि प्रार्थना समाजला बघायचा की….. एक प्रकारचे हे फ्री लान्स असे आणि त्याचा उत्साह पाहून त्याला कोणी अडवतही नसे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

पाच दिवसाचे, मग सात दिवसाचे आणि मग अनंत चतुर्थीच्या दिवशीचे गणपती अशी त्याला नाचायला मुबलक संधी मिळाली. तोही आनंदला. हे सगळे एन्जाॅय केले. त्याचे तेव्हा शालेय वय असल्याने सगळे कसे जमून गेले. मग गिरगावातील साहित्य संघ मंदिरात तो नाटकात भूमिका मिळण्यासाठी धडपड करु लागला आणि मग त्याने हे नाचणे अर्थात कमी कमी करतच बंद केले. मराठी चित्रपटसृष्टीत तो ‘सुपर स्टार ‘ झाल्यावरही आपले हे जुने दिवस अजिबात विसरला नाही. आपली ही जुनी आठवण तो आवर्जून सांगे आणि अगदी भारावून जाई.

प्रत्येक सेलिब्रेटिजच्या सणासुदीबद्दल आपल्या काही जुन्या आठवणी असतातच, लक्ष्याची आठवण काही वेगळीच होती. तो स्टार झाला, पण आपल्या जुन्या आनंदाला विसरला नाही हे जास्त महत्वाचे आहे. कालांतराने तो अंधेरीत राह्यला आला, त्याच्या घरी गणपती येऊ लागला, पण गप्पांच्या ओघात तो गिरगावातील विसर्जन मिरवणूकीची आठवण काढे. तेच तर महत्वाचे आहे…

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button