Ganesh Utsav 2018 : ‘घाडगे & सून’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील कलाकारांचा गणेशोत्सव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ghadge-and-sun.jpg)
भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं… सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते… गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठी वाहिनीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये हिने गणपती बाप्पाच्या काही आठवणी तसेच अनुभव सांगितले. ती म्हणते, ‘गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा, समाजाभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी पोहचता करायचं काम आम्हा छोट्या मंडळीवर होतं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा जो खूप चविष्ट लागायचा. त्या प्रसादाच खूप अप्रूप वाटायचं. आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. पण, विसर्जनाच्या दिवशी खूप उदास वाटतं.’
कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मालिकेतील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे याने देखील काही आठवणी आणि अनुभव सांगितले. ‘मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेंव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा. आमच्या घरातून जेंव्हा प्रसाद द्यायचा असायचा तेंव्हा मी बराच प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. मला एक सांगावसं वाटत गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरू नये. ध्वनी, प्लास्टिक आणि इतर होणारे प्रदूषण टाळावे. मंडळामध्ये स्पर्धा असावी पण द्वेष नसावा,’ असं तो सांगतो.