कोर्टरूम ड्रामा ते हॉरर; या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ चित्रपट व सीरिज

OTT Releases May 2026 New Movies & Series : मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज आहेत. यात सोनाक्षी सिन्हाच्या ‘सिस्टम’पासून ते ‘घोस्ट वॉर’पर्यंत अनेक दमदार रिलीजचा समावेश आहे. या नवीन कलाकृतींमुळे या आठवड्यात घरबसल्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार आहे. या आठवड्यात कोणत्या कलाकृतीत ओटीटीवर रिलीज होणार आहेत जाणून घेऊयात…
‘सिस्टम’ ही एक रंजक कोर्टरूम थ्रिलर सीरिज आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा सरकारी वकील नेहा राजवंशच्या भूमिकेत दिसणार आहे. वडिलांच्या कंपनीत पार्टनरशिप मिळवण्यासाठी तिला सलग १० खटले जिंकायचे असतात. या सीरिजमध्ये तिच्यासह दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका, आशुतोष गोवारीकर आणि आदिनाथ कोठारेही झळकणार आहेत. ही सीरिज २२ मे २०२६ पासून Amazon Prime Video वर पाहता येणार आहे.
‘सतरंगी- बदले का खेल’ ही एक क्राइम-रिव्हेंज थ्रिलर सीरिज आहे. यात बबलू महतोची भूमिका अंशुमन पुष्करने साकारली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला त्यांच्या जागी कलाकार म्हणून काम करावं लागतं. वडिलांचा व्यवसाय सांभाळताना बबलू दुहेरी आयुष्य जगत असतो. गावातील जातीयवाद, राजकारण आणि सत्तासंघर्षाच्या वातावरणात तो वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी धोकादायक योजना आखतो. ही सीरिज २२ मे २०२६ पासून झी ५ वर स्ट्रीम होणार आहे.
‘देसी ब्लिंग’- ही आगामी रिअॅलिटी सीरिज दुबईमध्ये राहणाऱ्या श्रीमंत आणि ग्लॅमरस भारतीयांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सीरिजमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश यांच्यासह अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. हाय-सोसायटी ड्रामा, मोठ्या पार्ट्या आणि वैयक्तिक नातेसंबंध यांची झलक या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही सीरिज २० मे २०२६ पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे
‘द बोरोस’ची कथा सॅमभोवती फिरते. ही भूमिका Alfred Molina यांनी साकारली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर सॅम न्यू मेक्सिकोमधील एका वृद्धाश्रमात राहायला येतो. मात्र तिथे त्यांचा सामना एका भयानक आत्म्याशी होतो. त्यानंतर तो काही विचित्र लोकांसोबत मिळून एका भीतीदायक आणि लपलेल्या धोक्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतो. ही सीरिज २१ मे २०२६ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
‘मधुविधु’ हा एक मल्याळम रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा अडूरमधील पारंपरिक पुरुषप्रधान कुटुंबातील अमृतराज उर्फ अम्मूभोवती फिरते. या चित्रपटात स्थानिक अंधश्रद्धांमुळे त्याला योग्य पत्नी शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा चित्रपट २२ मे २०२६ पासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
‘वारंट’ – हा एक दमदार तमिळ क्राइम ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा कोट्टई करप्पुसामीभोवती फिरते, जो शांत स्वभावाचा पोलीस कॉन्स्टेबल असतो. पोलीस दलात मान-सन्मान मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण अपमान, हिंसा आणि सत्तेमुळे तो टोकाचा निर्णय घेण्याच्या परिस्थितीत पोहोचतो. त्यानंतर तो एक मोठं पाऊल उचलतो. या चित्रपटात हा चित्रपट २२ मेपासून झी ५ वर पाहता येणार आहे.
‘घोस्ट वॉर’ या बहुचर्चित अॅक्शन थ्रिलरमध्ये जॅक रायनची भूमिका John Krasinski यांनी साकारली आहे. या सीरिजमध्ये जॅक रायन पुन्हा एकदा सीआयए एजंट्सबरोबर मिशनवर जातो आणि अशा शत्रूचा सामना करतो, ज्याला त्यांच्या प्रत्येक हालचालींची आधीपासूनच माहिती असते. यासोबतच त्याला स्वतःच्या भूतकाळातील काही न सुटलेल्या गोष्टींनाही सामोरं जावं लागतं. ही सीरिज २० मे २०२६ पासून प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.





