बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dharmendra | बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत बिघडल्याने सुमारे बारा दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी उपचार घेत होते. मात्र अखेरीस जुहूतील राहत्या घरी त्यांनी प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मागील काही दिवसांपासून विविध बातम्या आणि अफवा पसरत होत्या. देओल कुटुंबाकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही पार पडले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा कोहिनूर हरपल्याने संपूर्ण बॉलिवूड शोकाकुल झाले आहे.
हेही वाचा : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णानगरमध्ये विविध उपक्रम

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबातील लुधियाना जिल्ह्यातील नसराली येथे झाला. त्यांचे खरे नाव केवल कृष्ण देओल असून सिनेसृष्टीत ते ‘धर्मेंद्र’ या नावाने सर्वत्र ओळखले गेले. एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिलोपार्जित गाव रायकोटजवळील डांगो असून त्यांनी बालपण सहनेवाल येथे घालवले. लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना सिनेरसिक आणि कलाकारांमध्ये व्यक्त होत आहे.




