बागेत पुरलेले मृतदेह, प्रत्येक सीनमध्ये अंगावर काटा आणणारा थरार, ही क्राइम थ्रिलर वेबसिरिज पाहून झोप उडेल

crime thriller webseries : सस्पेन्स-थ्रिलर प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर एक दमदार सीरिज सध्या चर्चेत आहे. अवघ्या सहा भागांची ही वेब सीरिज पाहताना तुमचा श्वास रोखला जाईल, असं अनेकांचं मत आहे. जरी ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली असली तरी सध्या ती पुन्हा ट्रेंडमध्ये आली असून प्रेक्षकांच्या ‘मस्ट वॉच’ यादीत स्थान मिळवत आहे. या थरारक सीरिजचं नाव आहे द गार्डनर.
स्पॅनिश भाषेतील ही रोमँटिक क्राइम-थ्रिलर कथा एका गार्डनरभोवती फिरते, ज्याच्या बागेत भयंकर गुपित दडलेलं असतं. लहानपणी घडलेल्या धक्कादायक प्रसंगामुळे तो भावनाहीन बनतो. त्याच्या या अवस्थेचा फायदा त्याची आई उचलते आणि पैशासाठी त्याच्याकडून खून करवून घेऊ लागते. स्वतःच्या महत्त्वाकांक्षांसाठी मुलाला ‘हिटमॅन’ बनवणारी आई आणि तिच्या आदेशावर काम करणारा मुलगा ही धक्कादायक गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
हेही वाचा – Skipping केल्याने आरोग्यास किती आणि कसे होतात फायदे? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
कथानकात मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा या गार्डनरच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री होते. तो एका मुलीच्या प्रेमात पडतो; मात्र नियती असा खेळ खेळते की त्याच मुलीला संपवण्याचा आदेश त्याला स्वतःच्या आईकडून मिळतो. पुढे काय घडतं, हे पाहताना प्रेक्षक अक्षरशः थरारून जातात.
या मालिकेत Álvaro Rico, Catalina Sopelana आणि Cecilia Suárez यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित झालेली ही सहा भागांची सीरिज Netflixवर उपलब्ध असून हिंदी डबमध्येही पाहता येते. आयएमडीबीवर तिला 6.3 रेटिंग मिळालं आहे. जर तुम्हाला क्राइम, सस्पेन्स आणि भावनिक ड्रामा यांचा जबरदस्त मेळ पाहायचा असेल, तर ही सीरिज विकेंड बिंजसाठी नक्कीच योग्य पर्याय ठरू शकते.




