‘चित्रपट बनविण्यामध्ये टेक्निकल व्यक्तींचा महत्वाचा वाटा’; आकाश खुराना यांचे प्रतिपादन
![Akash Khurana said that technical persons play an important role in film making](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Akash-Khurana-780x470.jpg)
पुणे / प्रतिनिधी
सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सिनेमे वेगाने बदलत आहेत. त्यात वापरले जाणारे व्हीएफक्स, ऍनिमेशनमुळे आपले चित्रपट जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. त्यात बाहुबली आणि आरआरआर आदी चित्रपटात या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे चित्रपट जगभरात गाजले आणि करोडो रुपयांची कमाई देखील केली. त्यामुळे आगामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात विकसित होणार असून सरकारने देखील अश्या चित्रपटांना सबसिडी देण्याची तरतूद गेल्यावर्षीच्या आर्थिक संकल्पात केली आहे, असे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आकाश खुराना यांनी केले.
पुणे येथील कॅम्प भागातील डिझाईन स्कूल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डिझाईन स्कूल अकादमीचे संस्थापक सतीश नारायण व संचालिका श्रीदेवी सतीश आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी डिझाइन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम डिझाइन, ग्राफिक आणि वेब यासारख्या विविध माध्यम आणि मनोरंजन अभ्यासक्रमांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला.
आकाश खुराना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचा ४० वर्षांचा प्रवास सांगितला. कोणत्याही क्षेत्रात काम करताना नेतृत्व, गुणवत्ता, शिस्त, आणि वक्तशीरपणा महत्त्वाचा आहे. तरच आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो असा मोलाचा सल्ला खुराना यांनी विद्यार्थ्यांना दिला.
हेही वाचा – मंदिरातील पुजारी अर्धनग्न का? ड्रेसकोड वादावर छगन भुजबळ आक्रामक
सतीश नारायण म्हणाले, भारत सरकारने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स (एव्हीजीसी) उद्योगाला चालना देण्यासाठी ३ हजार ५०० करोड रुपये तरतूद केली आहे. गेल्या वर्षी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. या निधीचा देशातील उद्योग आणि शैक्षणिक धोरणामध्ये कसा विनियोग करायचा यासाठी एव्हीजीसी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या एव्हीजीसी टास्क फोर्समध्ये देशातील १२ सदस्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. या १२ सदस्यांमध्ये माझी देखील निवड केली आहे. त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार मानतो.
श्रीदेवी सतीश म्हणल्या, कौशिल्य आधारित शिक्षण महत्वाचे बनत असून विद्यार्थ्यांनी विविध कौशिल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक रोजगाराच्या संधी आपल्याला मिळू शकतात. सरकार देखील कौशिल्य आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे आम्ही देखील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कौशिल्य आधारित शिक्षण देत आहोत.