“दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही”; अभिनेत्री ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mamta Kulkarni | नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमध्ये बोल्ड भूमिकांसाठी आणि ग्लॅमरस प्रतिमेसाठी ओळखली जाणारी ममता, अलीकडे केलेल्या विधानांमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेत तो दहशतवादी नसल्याचं म्हटलं आहे.
ममता म्हणाली, दाऊद हा न कोणताही दहशतवादी आहे आणि न बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही घटनेत त्याचे नाव कधी आले आहे. मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी एका षड्यंत्राखाली त्याला बदनाम केले आहे. कोणाला गुन्हेगार ठरवण्यासाठी आरोप सिद्ध होणे आवश्यक आहे, नुसता प्रचार केल्याने कोणी गुन्हेगार होत नाही.
हेही वाचा : मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी मुदत द्या; राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती
दाऊदशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. माझे नाव एका व्यक्तीसोबत जरूर जोडले गेले होते. पण तुम्ही बघा, त्याने कोणताही बॉम्बस्फोट केला नाही. देशात देशविरोधी काही केले नव्हते. ज्याच्यासोबत माझे नाव जोडले गेले, त्याने कधी बॉम्बस्फोट केला नाही. मी आयुष्यात कधीही दाऊदला भेटले नाही, असंही ममता म्हणाली.
ममता कुलकर्णीचं नाव यापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत जोडले गेले होते. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या वादानंतर तिचे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. कधीकाळी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ममता कुलकर्णीचं आयुष्य अनेक वाद, अफवा आणि आरोपांनी वेढलेलं राहिलं आहे. तिच्या या नव्या विधानामुळे मात्र पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.




