‘अबब! विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य नव्या संचात नाट्यरसिकांच्या भेटीला
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे धमाल पुजाऱ्याच्या भूमिकेत
मुंबई : गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं रंगभूमीवर पुन्हा अवतरली. या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमीसुद्धा मागे नाही. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे. २ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे.
पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केलं आहे. हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवलं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे हे धम्माल पुजारी साकारणार आहेत. त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसंच बालकलाकार आयुष टेंबे, किनारा पाटील, गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा – भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करीत असून या नाटकाचं पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना आणि पालकांना आपल्या संस्कार आणि संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारं हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.
एकीकडे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहण्यासाठी नाट्यरसिक उत्सुक असतानाच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची सध्या जबरदस्त इनिंग सुरू असल्याचं पहायला मिळतंय. हास्यजत्रेच्या कार्यक्रमातून ते प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहेत. त्याचसोबत एकामागोमागून एक त्यांचे इतर प्रोजेक्ट्सही सुरू आहेत. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील प्रभाकर मोरे आणि धनश्री काडगांवकर यांच्यावर चित्रित झालेलं ‘शालू झोका देगो मैना’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे.




