‘हिचकी’ची कथा ‘राणी’साठी नव्हतीच ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/hichaki-.jpg)
अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चित्रपटातील अभिनयाचं प्रेक्षक- समीक्षकांकडून कौतुकदेखील करण्यात आलं. ‘हिचकी’साठी राणी मुखर्जीला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. या चित्रपटाची कथा खरंतर पुरुष पात्रासाठी लिहिण्यात आली होती. मात्र, जसजशी पटकथा पुढे सरकू लागली तसतशी यातील गाभा अधिक परिणामकारकरित्या मांडण्यासाठी एका स्त्री पात्राची निकड भासू लागली. त्यामुळे, नंतरच्या टप्प्यात राणी मुखर्जीचा मध्यवर्ती भूमिकेत विचार करत पटकथेत आवश्यक ते बदल करण्यात आले.
‘हिचकी’मध्ये राणीने नैना माथूर या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. तिला टॉरेट सिंड्रोमचा त्रास असतो. अनेक मुलाखती आणि बहुधा तितक्याच नकारांनंतर ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत पूर्णवेळ शिक्षिका होऊन आपलं स्वप्न पूर्ण करते. मात्र, थोड्याच काळात तिच्या लक्षात येतं की या वर्गात सगळी उद्धट, मस्तीखोर मुलं भरलेली आहेत. सतत काही ना खोड्या करण्याचेच उद्योग ही मुलं करत असतात. मात्र, नैना या मुलांसाठी काहीतरी करायचं ठरवते. सर्व अडचणींवर मात करत या मुलांना स्वत:च्या क्षमता कळाव्यात यासाठी ती प्रयत्न करते.