हनी सिंगचं ‘मखणा’ गाणं वादात, FIR दाखल करण्याची महिला आयोगाची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/2019-07-03-5.png)
रॅपर व गायक हनी सिंगचं नवीन गाणं वादात सापडलं आहे. ‘मखणा’ हा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये हनी सिंगसोबत गायिका नेहा कक्करसुद्धा पाहायला मिळतेय. पण या गाण्यात हनी सिंगने केलेल्या रॅपवर आक्षेप घेण्यात आला आहे. या रॅपमध्ये महिलांबाबत अशोभनीय व आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पंजाबच्या महिला आयोगाने या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. पंजाबच्या महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी यांनी ही मागणी केली आहे. मनीषा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून १२ जुलैपर्यंत याबाबतचा अहवाल मागितला आहे.
‘हनी सिंगच्या रॅपमध्ये महिलांविषयी अशोभनीय भाषा वापरली आहे. त्यामुळे हनी सिंग व संबंधित कंपनी अर्थात टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. तसंच या गाण्यावर बंदी घालण्यात यावी,’ अशी मागणी मनीषा यांनी केली आहे.
हनी सिंग गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्याने इंडस्ट्रीत पुनरागमन केलं.