breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

स्टंट आर्टिस्ट रेश्मा पठाण यांना ‘वुमन बिहाईंड द सिन’ पुरस्कार

मुंबई – देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ‘लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’चा दशकपूर्ती सोहळा यंदा पार पडणार आहे. स्त्री-पुरुष समानता, महिला हक्क, लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम बातमीदारी अशा विषयांवर कार्यरत माध्यम प्रतिनिधी, वेबसिरीज, नाटक, पुस्तके, फिल्मच्या माध्यमातून या मुद्यांविषयी जनजागृती करणाऱ्या प्रतिनिधींना ‘पॉप्युलेशन फर्स्ट’या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ने सन्मानित करण्यात येते. यावर्षी ‘लाडली जीवनगौरव पुरस्कार’ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना देण्यात येणार आहे. ‘लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी – वुमन बिहाईंड द सिन’चा पुरस्कार ‘शोले’ फेम महिला स्टंट आर्टिस्ट रेशमा पठान यांना तर ‘थिएटर’ विभागासाठीचा पुरस्कार महाबानू मोदी कोतवाल आणि पुअर बॉक्स प्रोडक्शन यांच्या ‘व्हजायना मोनोलॉग्स’ या क्रांतिकारी नाटकाला देण्यात येणार आहे. कोव्हीड महामारीची परिस्थिती लक्षात घेता या सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले आहे. १५ डिसेंबरला ‘पॉप्युलेशन फर्स्ट’च्या युट्युब पेजवर या सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ११ प्रतिनिधी आणि ६ जाहिरातींना विविध विभागाअंतर्गत या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साल २०१८-२०१९साठी यंदाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. “पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी लेखन, नाटक, पुस्तके, चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम पद्धतीने कथन केले आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. जाती, वर्ग आणि लिंग यांचे उत्तमरित्या विश्लेषण करत विजेते आणि सहभाग घेणाऱ्यांनी दाखवून दिले आहे की, स्त्री-पुरुष समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक माध्यमे सदैव तत्पर आहेत” असे ‘पॉप्युलेशन फर्स्ट’च्या संचालिका डॉ. ए.एल.शारदा म्हणाल्या.

लाडली जीवनगौरव पुरस्कार प्राप्त उषा खन्ना या हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पहिल्या महिला संगीत दिग्दर्शिकांपैकी एक आहेत. ‘हम तुमसे जुदा होके’, ‘छोडो कल की बाते’ अशा अनेक गाण्यांसाठी त्या नावाजल्या जातात. ‘वुमन बिहाईंड द सिन’चा पुरस्कार पटकाविणाऱ्या पहिल्या महिला स्टंट आर्टिस्ट रेशमा पठान यांनी ४००हून अधिक चित्रपटांमध्ये स्टंट आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. विशेषतः रेशमा यांनी ‘शोले’ चित्रपटात हेमा मालिनी यांचे बॉडी डबल म्हणून केलेले काम नावाजले जाते. आत्मचरित्रावर आधारित पुस्तक लिहिण्याच्या विभागाअंतर्गत लेखिका लिसा रे यांच्या ‘क्लोज टू द बोन’ पुस्तकाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लीसा रे यांच्या आयुष्याचा प्रवास तसेच त्यांनी कर्करोगाशी यशस्वी पद्धतीने केलेली मात यावर आधारित हे पुस्तक आहे. फ़िक्शन पुस्तक विभागाअंतर्गत मनरीत सोढी सोमेश्वर यांचे ‘रेडिअन्स ऑफ अ थाऊसंड सन्स’ हे पुस्तक, तर नॉन फिक्शन – स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर पुस्तक विभागाअंतर्गत सुप्रीता दास यांचे ‘फ्री हिट’ पुस्तक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

महिला अत्याचार, मुलांचे लैंगिक शोषण अशा सामाजिक मुद्यांवर नाटकांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यासाठी ‘एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनच्या’ मंजुल भारद्वाज यांना थिएटर विभागाअंतर्गत पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘फिचर फिल्म’विभागाअंतर्गत गीतांजली राव दिग्दर्शित ‘बॉंबे रोझ’ या भारतीय ऍनिमेटेड चित्रपटाला आणि ‘आर्टिकल १५’ या हिंदी चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. डॉक्युमेंट्री विभागाअंतर्गत ‘होली राईट्स’ला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘वेब सिरीझ’ विभागाअंतर्गत इंडियन ड्रामा वेब टेलिव्हिजन सिरीझ ‘मेड इन हेवन’ला पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतीय लग्नसंस्कृतीला दर्शविणारी ही कथा तारा आणि करण या दोन वेडिंग प्लॅनर्सची आहे. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित ‘फिचर फिल्म्स’ विभागाअंतर्गत ‘सोनी’ फिल्मला पुरस्कार देण्यात येणार आहे. या फिल्मचे दिग्दर्शन आयवन अय्यर, निर्मिती किम्सी सिंघ आणि कार्तिकेय नारायण सिंघ यांनी केली आहे. प्रख्यात सुफी गायिका झीला खान यांचे विद्यार्थी या सोहळ्यात विशेष सादरीकरण करणार आहेत. ”२००८सालापासून मी अनेक लहान मुलांसोबत काम करत असून त्यातील बहुतांश मुले वंचित आहेत. मात्र त्यांना जगात भारताचे संगीत दूत बनवण्याचे स्वप्न मी मनाशी बाळगले” असल्याचे झिला खान म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button