‘सेक्रेड गेम्स’ नंतर काय? जितेंद्र जोशी देणार चाहत्यांना उत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/jitendra-joshi.jpg)
‘सरताज साहेबांचा फोन आहे’, असं म्हणत आपल्या पत्नीलाही डावलणारा ‘हवालदार काटेकर’ सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात चांगलाच चर्चेत आला. ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या पहिल्या वहिल्या ओरिजिनल वेब सीरिजच्या माध्यमातून हा ‘काटेकर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज अतिशय प्रभावीपणे मांडणी करत सर्वांच्या भेटीला आणली आणि या सीरिजमधील प्रत्येक पात्र आपली अशी वेगळी छाप सोडून गेलं. ‘गणेश गायतोंडे’ साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणू नका, ‘कुक्कू’ साकारणारी कुब्रा सैत म्हणू नका किंवा मग ‘सरताज’च्या भूमिकेत दिसणारा सैफ अली खान म्हणू नका. प्रत्येक पात्राने मोठ्या प्रभावीपणे त्यांच्या वाट्याला आलेली पात्र साकारली आहेत. आता ‘सेक्रेड गेम्स’नंतर ही मंडळी पुढे काय करणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याचंच उत्तर अभिनेता जितेंद्र जोशी आज (बुधवार) देणार आहे.
‘सेक्रेड गेम्स’नंतर काय करणार, वेब सीरिजच्या सिक्वलमध्ये झळकणार की एखादा चित्रपट करणार असे अनेक प्रश्न या कलाकाराला विचारले गेले. त्याचंच उत्तर जितेंद्र सोशल मीडियाद्वारे देणार आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करून माहिती दिली. ‘अनेकजण विचारतात सेक्रेड गेम्स नंतर काय? उद्या उत्तर मिळेल,’ असं ट्विट त्याने मंगळवारी केलं. त्यामुळे तो नेमकं काय सांगणार आहे याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
‘सेक्रेड गेम्स’च्या सिक्वलची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. त्यामुळे जितेंद्र या सिक्वलसंदर्भात काही घोषणा करणार का असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या ट्विटच्या कमेंट्समध्येही नेटकऱ्यांनी त्याला सिक्वलसंदर्भात प्रश्न विचारले आहेत. ‘सेक्रेड गेम्स’च्या निमित्ताने ‘कॉन्स्टेबल काटेकर’ या पात्राद्वारे जितेंद्रने चाहत्यांच्या मनात घर केलं. जितेंद्र जोशीने मोठ्या ताकदीने हे पात्र साकारलं असून त्याची एकनिष्ठता आणि मराठमोळ्या पोलिसाचा बाज या गोष्टी त्याने चांगल्याच जमवून नेल्या आहेत. तेव्हा आता जितेंद्र काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.