श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांवर शक्ती कपूर म्हणतात..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Shakti-Kapoor-with-shraddha.jpg)
‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी गुरुवारी सकाळपासूनच जोर धरला. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा ही रोहन श्रेष्ठा या फोटोग्राफरला डेट करत असून २०२० मध्ये हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘खरंच? माझी मुलगी लग्न करणार आहे का? तिच्या लग्नाचं आमंत्रण मला द्यायला विसरू नका प्लीज,’ असं म्हणत शक्ती कपूर यांनी श्रद्धाच्या लग्नाचं वृत्त फेटाळलं. मी वडील असून मलाच माझ्या मुलीच्या लग्नाविषयी माहीत नाही. त्यामुळे लग्न केव्हा आणि कुठे असेल याची कल्पना मला नक्की द्या, असं ते हसत म्हणाले.
याआधी श्रद्धा कपूर अभिनेता फरहान अख्तरला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र फरहानसोबतचं नातं शक्ती कपूर यांना मान्य नव्हतं. या दोघांच्या ब्रेकअपनंतर श्रद्धा आणि तिचा मित्र रोहन श्रेष्ठा यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याचं समजतंय. रोहनने अनेकदा श्रद्धा कपूरच्या कौटुंबिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली आहे.
श्रद्धाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये ती ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यानंतर ती ‘छिछोरे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ देणार आहे.