ललित प्रभाकरला या दाक्षिणात्य अभिनेत्याची भुरळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/laleet-prabhakar-.jpg)
प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ नेहमीच पाहायला मिळते. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनाही टॉलिवूड चित्रपटांनी भुरळ घातली आहे. कित्येक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेकसुद्धा बॉक्स ऑफीसवर तुफान चालतात. अशाच एका चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ असं तेलुगू चित्रपटाचं नाव आहे, ज्याचा हिंदी रिमेक प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार विजय देवरकोंडा हा सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला असून त्याच्या लूकने कलाकारसुद्धा प्रभावित झाले आहेत. मराठी अभिनेता ललित प्रभाकर यानेसुद्धा हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखा लूक केला आहे.
सोशल मीडियावर ललित सक्रीय असतो. त्याच्या आवडीनिवडी, विविध फोटो, व्हिडिओ तो शेअर करत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ‘अर्जुन रेड्डी मराठीत करायचा का,’ असा प्रश्न विचारला आहे. अर्जुन रेड्डीच्या भूमिकेतील विजय देवरकोंडाचा लूक हुबेहूब ललितचा पाहायला मिळत आहे. या फोटोंच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी खरंच मराठी रिमेक आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ललित प्रभाकर, विजय देवरकोंडा
अर्जुन रेड्डीच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. या रिमेकमध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. यामध्ये शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.