लग्न न करताच बाबा हो, राणी मुखर्जीचा सलमानला सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/salman-rani.jpg)
सध्या बॉलिवूड कलाकारांमध्ये लग्नाचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कलाकार मंडळी गुपचूप लग्न करण्याच्या तयारीतही असल्याचे म्हटले जातेय. या सर्व लग्नाच्या चर्चांमध्ये एक नाव नेहमीच समोर येते ते म्हणजे अभिनेता सलमान खानचे. सलमान लग्न कधी करणार हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करतोय. ऐश्वर्यापासून कतरिनापर्यंत विविध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडले गेले. पण, आतातरी त्याने संसार थाटावा अशीच असंख्य चाहत्यांची अपेक्षा आहे. पण, अभिनेत्री राणी मुखर्जी मात्र याला अपवाद ठरतेय. सलमानने लग्न करावे अशी राणीची मुळीच इच्छा नाही. किंबहुना लग्न न करताच बाबा हो असा सल्लाच तिने सलमानला दिला आहे.
‘दस का दम’ या रिअॅलिटी शोमध्ये राणीने शाहरुख खानसोबत हजेरी लावली. त्याच्याच प्रोमोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिअॅलिटी शोच्या एका टास्कदरम्यान सलमान ज्याप्रकारे लहान बाहुलीची देखभाल करत होता, ते पाहून राणीने त्याला लग्नाचा विचार सोडून तू बाबा हो असा सल्ला दिला.
सलमानने लग्न न करताच बाबा व्हावे, असे राणी खोडकरपणे म्हणाली खरं. पण, लग्नाविषयीच्या प्रश्नांनी इतरांप्रमाणेच तिनेही त्याच्या नाकी नऊ आणले. एकेकाळी ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचा तोच अंदाज आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्याची निखळ बाजू पुन्हा एकदा या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.