बापरे! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा
![Chief Minister, Deputy Chief Minister angry over Nana Patole's resignation; Confirmation of Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sanjay-Raut-1200.jpg)
पाटणा: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झालेलीय. सुशांतच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक आणि खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशांतचे चुलत भाऊ आणि बिहार भाजपचे आमदार नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. नीरज सिंह यांच्या या इशाऱ्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. राऊत यांनी रविवारच्या रोखठोक सदरात सुशांतचे वडिल के.के. सिंह यांच्याबद्दल केलेल्या लिखाणामुळे सुशांतचं कुटुंब नाराज असल्याचं म्हटलं जातं आहे.
के.के. सिंह यांनी दोन लग्न केलेले आहेत. त्यामुळे सुशांत हा नाराज होता. तो त्यांच्या कुटुंबीयांशी देखील बोलत नव्हता. सुशांतचा बिहारशी तसा काहीच संबंधही नव्हता. त्याला सगळं मुंबईने दिलेलं होतं असंही राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलेलं होतं. एक सुशांत; बाकी अशांत! एका आत्महत्येचं राजकारण! असा लेख राऊत यांनी सामनाच्या रविवार पुरवणीत लिहिलेला होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे भावनिक नाते राहिलेले नव्हते. वडिलांना फुस लावून FIR दाखल केला गेला असंही राऊत यांनी त्या लेखात म्हटलेलं होतं.