“फन्ने खान’साठी ऐश्वर्याच्या मानधनात कपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/aishwarya-rai.jpg)
जवळपास दोन वर्षांच्या ब्रेक नंतर ऐश्वर्या “फन्ने खान’मधून पुनरागमन करते आहे. अनिल कपूर आणि राजकुमार राव हे तिच्याबरोबर या सिनेमात असणार आहेत. “फन्ने खान’ची घोषणा होऊन जवळपास दोन वर्षे व्हायला आली, तरी अजूनही हा सिनेमा पूर्ण होण्याची आणि रिलीज डेट जाहीर होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सलमान खानच्या “रेस 3′ बरोबर 15 जूनला “फन्ने खान’ रिलीज होणार असे पूर्वी समजले होते. मात्र नंतर 13 जुलैला तो रिलीज होईल असे ठरली. मात्र त्याही मुहुर्तावर सिनेमा रिलीज केला जाऊ शकणार नाही, हे लक्षात आल्यावर आणखी एक महिना पुढे म्हणजे 3 ऑगस्टला “फन्ने खान’चा मुहुर्त ठरला. अजून तर सिनेमाचे शुटिंगही पूर्ण झालेले नाही. बराचसा भाग शूट झाला आहे. मात्र याच दरम्यान सिनेमाचे निर्माते क्रिअर्स एंटरटेनमेंट यांनी सिनेमाची मालकी भूषण कुमारकडे सुपूर्त केली.
सहाजिकच नवीन प्रॉडक्शन कंपनीने खर्चाचा फेरआढावा घेतला आणि सिनेमाचे बजेट कमी करायचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रॉडक्शनच्या खर्चामध्ये मोठी कपात करावा लागणार असे स्पष्ट झाले. अन्य खर्चांच्या बरोबर कलाकाराअंच्या मानधनामध्येही मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. प्रमुख कलाकार असलेल्या अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याबरोबर ऐश्वर्या राय बच्चनलाही मानधनामध्ये कपात करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. सिनेमाचे काही सीन आणि दोन गाण्यांचे शुटिंग होणे बाकी आहे. बहुतेक शुटिंग पूर्ण झाल्यावर अशी विचारणा झाल्यामुळे हे कलाकार सिनेमात काम करण्यास नकारही देऊ शकणार नाहीत. या विनंतीवर या कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिली हे अद्याप समजू शकलेले नाही. जर “फन्ने खान’मध्ये कमी पैशात काम केल्याचे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये समजले तर ऐश्वर्या सारख्या लीडींग ऍक्ट्रेसला इतर सिनेमांच्या मानधनाबाबतही तडजोडीची भूमिका घ्यायला विचारले जाऊ शकते. आपली फी ही आपल्या स्टेटसला अनुसरून असायला हवी, असे ऐश्वर्याला वाटणे स्वाभाविक आहे.