प्रेक्षकांची जोरदार पसंती : ‘प्रवास’ चित्रपटाची चौथ्या आठवड्यात यशस्वी वाटचाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/x120.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांनाच जगण्याची उमेद देणारा असतो, हा संदेश देणाऱ्या अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे या दिग्गजांच्या अभिनयाने नटलेल्या ‘प्रवास’ चित्रपटाला सर्वत्र प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे. प्रमुख शहरांतून दमदार वाटचाल करीत चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रभरातील ५० चित्रपटगृहांतून ‘प्रवास’ चित्रपटाची घौडदौड सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम छंगानी यांनी केली असून लेखन–दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केले आहे.
‘किती जगायचं यापेक्षा कसं जगायचं’? हे सांगणारा हा ‘प्रवास’ मनाला नुसता भिडत नाही तर अंत:र्मुख करतो, अशा शब्दात प्रेक्षकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेत्री श्रद्धा कपूर, जुही चावला, पूनम धिल्लाँ, भाग्यश्री पटवर्धन, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, निवेदिता सराफ, प्रतिमा कुलकर्णी, तेजस्विनी कोल्हापुरे या सारख्या असंख्य मान्यवरांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
लेखन, अभिनय, गीत-संगीत, छायाचित्रण आणि तांत्रिक बाजू या सर्वच बाबतीत मनाला भिडणारा हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना तितकाच भावतोय. ‘वडिलधाऱ्यांची बाजू आज या चित्रपटामुळे समजू शकलो’ अशा भावना तरुणवर्ग व्यक्त करतायेत तर ‘यापुढे कसं जगायचं’ हा वेगळा दृष्टीकोन या चित्रपटाने शिकवला, असं सांगत वयस्कर प्रेक्षक भावनिक झालेले दिसतायेत. हा चित्रपट नव्हे तर एक ‘अनुभव’ आहे असा शब्दात ‘प्रवास’ चा प्रेक्षकांकडून गौरव केला जातोय.