‘दीपिका वर्गात स्वप्न पाहते’, शिक्षकांच्या शेऱ्यावर रणवीरची भन्नाट कमेंट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/13.jpg)
प्रत्येकाकडे त्यांच्या शालेय जीवनातील कोणती ना कोणती आठवण ही नक्कीच असते. कोणाकडे त्यांच्या शाळेच प्रगतीपुस्तक असतं. तर कोणाकडे प्रोजेक्ट कार्ड, एखादं प्रमाणपत्र अशा शाळेच्या अनेक आठवणी आपण जपून ठेवल्या असतात. तशीच शाळेची एक आठवण अभिनेत्री दीपिका पदुकोणने जपून ठेवली असून तिने सोशल मीडियावर तिच्या शाळेचं प्रगतीपुस्तक शेअर केलं आहे. विशेष म्हणजे या फोटोवर रणवीर सिंगनेदेखील कमेंट केली आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर तिच्या शाळेच्या प्रगतीपुस्तकाचा फोटो शेअर केला असून यावर तिच्या शिक्षकांनी एक शेरा (रिमार्क) दिला आहे. हा शेरा पाहून कलाविश्वातील अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत दीपिकाची मस्करी केली आहे.
![](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2019/10/Untitled-670x194.jpg)
दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या प्रगतीपुस्तकावर ‘दीपिका वर्गात खूप गप्पा मारते’ आणि ‘वर्गात असताना स्वप्नांमध्ये रमते’, असा शेरा शिक्षकांनी दिला होता. तिला मिळालेला हा शेरा पाहिल्यानंतर रणवीरने ‘ट्रबल मेकर’ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका पोस्टवर त्याने ‘हो मॅडम, मी तुमच्या मताशी सहमत आहे’, असं म्हटलं आहे.
![](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2019/10/Untitled-2-670x243.png)
दरम्यान, दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त असून दीप-वीर ही जोडी लवकरच ’83’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका वठविली आहे.