..तेव्हा सर्वाधिक डिस्टर्ब झालो: अभिनेता शाहरुख खान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/ted-1.jpg)
नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानने जगप्रसिद्ध ‘टेड टॉक’मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक चढउतारांवर संवाद साधला आहे. अबराम हा आर्यन आणि त्याच्या गर्लफ्रेण्डचा मुलगा असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्याने कुटुंबावर किती आघात झाला होता, याबद्दलची मनातली खदखदही शाहरुखने कार्यक्रमात बोलून दाखवलीय.
गेल्या महिन्यात वेंकूवर येथे झालेल्या टेड टॉकमध्ये शाहरुखने भाग घेतला होता. त्याचा १७.५१ मिनिटांचा व्हिडिओ ‘टेड’च्या अधिकृत यूट्यूब अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शाहरुखने अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली आहेत.
चार वर्षांपूर्वी शाहरुखचं तिसरं अपत्य म्हणजेच अबरामचा जन्म झाला तेव्हा हे मूल शाहरुखचा मोठा मुलगा आर्यनचं (तेव्हा १५ वर्षांचा होता) असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्याबाबत बोलताना शाहरुख म्हणाला, रोमानियात कारमध्ये एका मुलीसोबत आर्यन आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या कथित व्हिडिओचा संदर्भ घेऊन अबराम हा आर्यनचा मुलगा असल्याचा अर्थ काढण्यात आला होता. या सगळ्या प्रकाराने मी, पत्नी गौरी आणि आमचं संपूर्ण कुटुंब ‘डिस्टर्ब’ झालं होतं, असे शाहरुख म्हणाला. आर्यन रोमानियात कार चालवताना दाखवण्यात आले आहे. ही गोष्ट कशी खोटी आहे, याचं स्पष्टीकरणंही शाहरुखने दिलं. २०१३ मध्ये माझी पत्नी गौरी आणि मी तिसऱ्या अपत्याबाबत निर्णय घेतला. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून अबराम आमच्या आयुष्यात आला, असे शाहरुखने स्पष्ट केले.
शाहरुखचं बालपण दिल्लीत गेलं. तो १४ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हाचा एक प्रसंग आठवताना तो भावुक झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला ती वेळ रात्रीची होती. हॉस्पिटमध्ये जाताना शेजारचा कार चालक आम्हाला बडबडला. माणूस मेल्यानंतर लोक टिपही चांगली देत नाहीत, असे तो म्हणाला. त्यानंतर हॉस्पिटलमधून परतताना मी वडिलांचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेऊन कार चालवण्यास सुरुवात केली. घरापर्यंत मी कार चालवली. हे पाहून आई बघतंच राहिली. अरे तू कार चालवायला कधी शिकलास?, असा प्रश्न तिने केला. त्यावर ‘आत्ताच’ असं उत्तर मी दिलं आणि आईलाही भरून आलं असं शाहरुख म्हणाला.