“ठग्ज ऑफ हिंदुस्थान’साठी 2 जहाजांची निर्मिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/thugs-of-hindustan.jpg)
आमिर खानच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये प्रचंड ऍक्शन आणि ऍडव्हेंचरचा मालमसाला असणार आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील कोणत्याही सिनेमामध्ये केले गेले नसतील, असे ऍडव्हेंचर स्टंट यामध्ये असणार आहेत. त्यासाठी यशराज फिल्म्सने 2 लाख किलो वजनाची दोन अतिविशाल जहाजे तयार करवून घेतली आहेत. त्यासाठी एक हजारपेक्षा अधिक लोकांचे श्रम कारणी लागले आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिजाईनर आणि जहाज बांधकाम व्यवसायिकांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. त्यांच्या निर्माणासाठी वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लागला आहे.
युरोपात माल्टाच्या किनाऱ्यावर या जहाजांची बांधणी झाली. “ठग्ज…’ हा पुरातन काळातील कथेवर आधारलेला सिनेमा असणार आहे. त्यामुळे या जहाजांची रचनाही त्या काळाला सुसंगत अशीच करण्यात आली आहे. इतक्या मेहनतीने तयार केलेली ही जहाजे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर ऍक्शन सिक्वेन्समध्ये बघायला मिळणार आहेत.
“ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे दोघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्यांच्या बरोबर कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखही असणार आहेत. त्यांनाही आमिरच्या बरोबरीने स्टंट आणि ऍक्शन सीन करायला लागण्याची शक्यता आहे.