ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/reema.jpg)
मुंबई : कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या.
मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या जात.
रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.
बॉलीवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचीत होत्या. ‘कुछ कुछ होता है’ मध्ये काजोलची आई, ‘हम आपके हैं कौन’ मध्ये माधुरी दीक्षितची आई, ‘वास्तव’मध्ये संजय दत्तची आई आणि मैने प्यार किया सिनेमात सलमान खानची आई, यासारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत.