breaking-newsमनोरंजन

चीनमधल्या ‘ट्रान्स कम्युनिटी’ बद्दल बोलणारा ‘द रिब’…(इफ्फी 2018)

ICFT-युनेस्को गांधी अवॉर्डच्या कॅटेगरी मध्ये ‘द रिब’ हा चीनमधल्या ‘ट्रान्स कम्युनिटी’ बद्दल बोलणारा चित्रपट इफ्फी मध्ये पाहायला मिळाला. समलैंगिकता हा विषय गेल्या काही वर्षांपासून सर्वच चित्रपट दिग्दर्शकांचं लक्ष वेधतोय. पण ट्रान्सजेंडर आणि ट्रान्ससेक्शुअल याविषयी खोलात जाऊन सांगणाऱ्या कथा खूप कमी मिळतात. चीनमध्ये एका तरुणाला त्याने लिंगबदल करून घेतल्याने कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. २०१६ मध्ये न्यायालयाने त्या तरुणाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. या घटनेशी साधर्म्य सांगणारी ‘द रिब’ या चित्रपटाची कथा आहे.

हुवान नावाचा तरुण वयाच्या तिशीपर्यंत त्याच्या मनातील गोष्ट घरच्यांना सांगू शकत नसतो. मुळातच हुवान ला लहानपणापासूनच तो विरुद्धलिंगी म्हणजेच मुलगी असल्याचे वाटत असते. मुलींसारखी वेशभूषा करणं त्याला आवडत असतं. पण हे तो त्याच्या वडिलांपासून लपवतो. काही काळानंतर तो त्याच्या एका मित्रासोबत दुसरीकडे राहायला लागतो. ट्रान्ससेक्शुअल कम्युनिटीचे इतर काही जण त्याच्या संपर्कात येतात. त्यात त्याच्या एका जवळच्या मित्राने लिंगबदलासाठी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलेला असतो. हुवान सुद्धा तसंच ऑपरेशन करू इच्छित असतो. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार हुवानला त्याच्या वडिलांची परवानगी व्हिडिओ स्वरूपात द्यायची असते. सामान्य ख्रिश्चन समाजात आयुष्य जगणारे हुवानचे वडील सर्वप्रथम त्यांना जेव्हा हुवानच्या ट्रान्ससेक्शुअलबद्दल कळतं तेव्हा मुळापासून हादरून जातात. ते हुवानला समजवण्याचा अतोनात प्रयत्न करतात. पण हुवान लिंगबदलाचं ऑपरेशन करण्यावर ठाम असतो. शेवटी हुवान ते ऑपरेशन करतो का ? त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन न करता फक्त मुलींसारखे कपडे घालून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात.

दिग्दर्शक झांग वे यांनी खूप महत्वाच्या अशा विषयावर हा चित्रपट तयार केला आहे. 85 मिनिटांच्या या चित्रपटात अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांवर पकड मिळवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. आणखी एक प्रमुख गोष्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फिल्म असल्यामुळे मूळ विषयाकडे फोकस करायला सोप्पं जातं. त्यामुळेच चित्रपटात ब्लॅक अँड व्हाईट थीम वापरण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय त्यांचा अनुभव दर्शवतो. सर्व कलाकारांनी ताकदीचा अभिनय केला आहे. संबंध चित्रपट पाहताना आपण हुवानच्या आयुष्यात नेमकं काय होतंय याचा विचार करत राहतो, शिवाय दुसरीकडे ट्रान्सजेंडर आणि ट्रान्ससेक्शुअल यांच्या प्रश्नांबद्दल सुद्धा आपल्याला माहिती होते. चीन मध्ये लिंगबदल केलेल्या व्यक्तींना त्यांच्या ओळखपत्रावर नवीन लिंग लिहिण्यासाठी सरकारने कायदा केलेला आहे. त्यामुळे तिथल्या ट्रान्सजेंडर आणि ट्रान्ससेक्शुअल कम्युनिटीला या कायद्याचा थोडा आधार नक्कीच मिळतो. पण कायदा असून उपयोग नाही, ज्या समाजात तुम्ही राहता, वावरत त्यांनी सुद्धा तुमचा स्वीकार कार्याला हवा. हीच अपेक्षा चित्रपटात हुवान आणि त्याचे इतर मित्र-मत्रिणी करत असतात.

दरवर्षी इफ्फीमध्ये ICFT-युनेस्को गांधी अवॉर्डच्या कॅटेगरीत तगड्या फिल्म्स पाहायला मिळतात. ट्रान्ससेक्शुअल या एका महत्वपूर्ण विषयाबद्दल बोलणारा ‘द रिब’ म्हणूनच प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button