चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/69872264_2495211427202024_8637058913042169856_n.jpg)
कोल्हापूर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याविरोधात कार्यकारिणी बैठकीत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली. भोसले यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आल्याचे धनाजी यमकर यांनी सांगितले. तर खुर्चीच्या हव्यासापोटी हा खेळ सुरू असून,
या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
भोसलेंवरील अविश्वास ठरावाला आठ सदस्यांनी पाठिंबा दिला, तर चार सदस्यांनी विरोध केला. सत्ताधारी सदस्यांनी आपल्याच अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्याची महामंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
शहाजी कॉलेजमध्ये चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक गुुरुवारी दुपारी 12 वाजता सुरू झाली. प्रारंभी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन केल्यानंतर लगेचच इतर सदस्यांनी मेघराज भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो आठ विरुद्ध चार अशा बहुमताने मंजूरही करण्यात आला.
भोसले यांनी ही सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा केला; पण प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार व वर्षा उसगावकर यांनी त्यांना तुमच्या मनमानीमुळेच ही वेळ आल्याचे भोसले यांना सुनावले.
भोसले यांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे महामंडळाच्या कायदे सल्लागाराला पाचारण करण्यात आलेे. सदस्यांची मते विचारात घेऊन बहुमताने झालेला निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर धनाजी यमकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवण्यात आले. दरम्यान, याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.