“काला’वरून रजनीकांतना 101 कोटींची नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rajnikant-k.jpg)
रजनीकांत यांचा “काला’ येत्या 7 जून रोजी रिलीज होण्यास तयार आहे. मात्र कावेरी पाणी वाटपावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या सिनेमावर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय रजनीकांत यांना एक नोटीसही देण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्यावर 101 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकण्यात आला आहे. एस. तिराविम यांचा मुलगा जवाहर नाडर यांनी रजनीकांत यांना ही नोटीस पाठवली आहे.
रजनीकांत आणि त्यांचा जावई “काला’ हा सिनेमा केवळ आपल्या वडिलांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बनवत आहेत. एखाद्या राजकीय षडयंत्राप्रमाणे द्रविण आणि काही मागास जातींच्या अधिकाऱ्यांचे हनन करण्याच्या हेतूने हे केले जात आहे. आपल्या वडिलांचे नाव वेगवेगल्या इंटरव्ह्यूमधून सातत्याने घेतले जात आहे. उच्चवर्णीयांची साथ मिळावे म्हणूनच रजनीकांत असे करत आहेत, असा आरोप जवाहर नाडर यांनी केला आहे.
काला करिकारन हे नाव समाजातील दोन गटांमध्ये भेद पाडण्यासाठीच दिले गेले आहे. म्हणून रजनीकांत यांनी 36 तासांच्या आत माफीनामा लिहून द्यावा अन्यथा 101 कोटी रुपये भरपाईच्या दाव्याला सामोरे जावे, असे नाडर यांनी या नोटीसीमध्ये म्हटले आहे.