अभिनेत्री पायल रोहतगीला मिळाला जामीन, तुरुंगात थंड जमिनीवर चटई अंथरुन झोपल्याचा सांगितला अनुभव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/4-2.png)
मुंबई | महाईन्यूज |
अभिनेत्री पायल रोहतगीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ केला होता. याप्रकरणात राजस्थान पोलिसांनी तिला अहमदाबाद येथून १५ डिसेंबर रोजी अटक केली होती. या प्रकरणी पायल रोहतगीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगाच्या बाहेर आल्यावर प्रसारमाध्यामांशी बोलताना पायलने कोठडीतील रात्रीचा अनुभव सांगितला आहे.
‘तुरुंगात खूप थंडी होती आणि त्या तुरुंगातील खोल्या सुद्धा अस्वच्छ होत्या. मी त्यारात्री खूप घाबरले होते. मी थंड जमिनीवर चटई अंथरुन झोपले होते. पण मला रात्रभर झोप लागली नाही. मी आशा करते की हा तुरुंगामधील अनुभव माझ्या आयुष्यातील शेवटचा अनुभव असावा’ असे पायल म्हणाली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/0.png)
‘मी महिला जनरल वॉर्डमध्ये होते. तेथे अनेक महिला होत्या आणि त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला. त्यांच्या गोष्टी ऐकून मी भावूक झाले’ असे पायल पुढे म्हणाली. त्यानंतर तिने तिच्यासोबत ५ मोठ्या गुन्हातील गुन्हेगार असल्याचे सांगितले. ‘तुरुंगामधील जेवण अजिबात चांगले नव्हते. पण ज्या लोकांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी ते ठिक होतं. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर मी खूप खूश आहे आणि त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची मी आभारी आहे’ असे पायल पुढे म्हणाली.