अभिनेत्री जान्हवी कपूरने मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर
![Actress Janhvi Kapoor has bought a house worth crores in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/जान्हवी-कपूर.jpg)
मुंबई – कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर सरकारने मालमत्ता खरेदीत मुद्रांक शुल्कात मोठी कपात केली होती. याचा फायदा उचलत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मुंबईत प्रॉपर्टी विकत घेतली. आलिया भट्टनंतर या यादीत आता जान्हवी कपूरचं नावही जोडलं गेलं आहे. गेल्या महिन्यात मुंबईत जान्हवीने कोट्यवधी रुपयांचे नवीन घर विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे. जान्हवीचं हे घर जुहू येथील एका इमारतीत १४, १५ आणि १६ व्या मजल्यावर आहे. जान्हवीने गेल्या वर्षी ७ डिसेंबरला हा करार केला होता. विशेष म्हणजे जान्हवीच्या या नवीन घराची किंमत जवळपास ३९ कोटी रुपये इतकी असून तिने ७८ लाख रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरलं आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरने आतापर्यंत फक्त ‘धडक’ आणि ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर यंदा तिचे राजकुमार राव सोबतचा ‘रुही अफझाना’ आणि कार्तिक आर्यनसोबतचा ‘दोस्ताना २’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय जान्हवी करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म ‘तख्त’ चित्रपटातही दिसणार आहे.