अभिनेता संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशात रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sanjay_Dutt_2.jpg)
मुंबई – चौथ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त हा आपल्या पत्नीसह अचानकपणे परदेशी रवाना झाला आहे. संजय दत्तच्या प्रकृतीबाबत बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याच्या चाहत्यांना काळजी वाटत आहे. 11 ऑगस्ट रोजी संजय दत्त कोरोना चाचणीसाठी गेला असता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्याने किमोथेरपीचा पहिला टप्पाही पूर्ण केला आहे.
संजय दत्त हा मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता मुंबईहून दुबईला रवाना झाला. त्याची मुले शहरान आणि इकरा ही दुबईत असून संजय दत्त त्यांना दुबईला जाऊन भेटला. पुढील 10 दिवस संजय दत्त आणि त्याचे कुटुंबीय दुबईमध्ये राहणार आहेत. कदाचित तेथून संजय दत्त आपल्या कुटुंबासहित अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये संजय दत्त याची 30 वर्षीय मुलगी त्रिशीला ही राहते. संजय दत्त अमेरिकेत किंवा सिंगापूरमध्ये कर्करोगावरील पुढील अद्ययावत उपचार घेणार आहे.
सुरुवातीला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात संजय दत्तला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर किमोथेरपी करण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे चित्रपटाचे चित्रीकरण बंद असल्यामुळे संजय दत्त हा पूर्ण विश्रांती घेऊन आपल्या कर्करोगावर उपचार घेणार आहे.