अभिनेता इरफान खानवर 4 केमो पूर्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/irrfan-khan-1-696-1-1.jpg)
- आजारानंतर पहिल्यांदाच दिली उपचाराची माहिती
मुंबई – बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्यावर लंडन येथे न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या कॅन्सरच्या आजारावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर 4 केमो पूर्ण झाल्या असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यानंतर इरफान खानने नुकतीत एका मुलाखतीतून आपल्या प्रकृती आणि उपचारांविषयी माहिती दिली.
या मुलाखतीत इरफान खान याने सांगितले की, केमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. जेव्हा सहा सेशन पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसरे सेशन पूर्ण झाल्यावर पॉजिटिव्ह रिझल्ट आला आहे. तरीही सहाव्या सेशनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि तेव्हाच आजाराबाबत स्पष्टपणे समजेल. मग पाहूया आयुष्य मला कुठे घेऊन जाते, असे इरफान म्हणाला.
आजार आणि उपचारांबद्दल इरफान म्हणाला की, आजारपणात मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याला पाहिले आहे. आयुष्यात तुमच्यासमोर अनेक आव्हाने येतात, पण मला वाटतं की, हा माझ्यासाठी कठीण परीक्षेचा काळ आहे. मी आता एका वेगळ्या अवस्थेत आहे. सुरुवातीला मला आजाराबाबत समजले तेव्हा धक्का बसला. पण मी आता स्वत:ला जास्त ताकदवान, प्रोडक्टिव्ह आणि निरोगी समजत आहे.
“मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होते. कारण माझ्या हातात काही नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. पण जे काही माझ्या हातात आहे, ते मी सांभाळू शकतो. आयुष्याने मला एवढं काही दिले की, त्याच्याप्रति कृतज्ञ असायला हवी. उपचारादरम्यान माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी आता अशा स्थितीत आहे की, मी 30 वर्षे जरी मेडिटेशन केले असते तरी इथे आलो नसतो, असे इरफान म्हणाला.