राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना भोगावती साखर कारखाना ठरला
भोगावती साखर कारखान्याने यंदा विक्रमी ऊस दर जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊस दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे. शेतकरी संघटनांच्या दबावानंतर साखर कारखान्यांकडून दर जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ३ हजार ६५३ रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आहे. चेअरमन शिवाजीराव पाटील व संचालक मंडळ भोगावती सह.साखर कारखाना यांनी घेतलेल्या बैठकी नंतर हा निर्णय देण्यात आला.
यापूर्वी कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याने ३ हजार ६१४ रुपये दर जाहीर केला होता. भोगावती कारखान्याने दिलेला दर राज्यातील सर्वाधिक ठरल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळणार आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी साखर कारखानदारांनी दर जाहीर करूनच धुराडे पेटवावे, अशी भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील इतर कारखान्यांनाही दर जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे.
हेही वाचा – पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; सखोल चौकशी करण्याचे आदेश
भोगावती कारखान्याचा हा दर राज्यातील पहिला विक्रमी उस दर ठरला आहे. दरम्यान यावर शेतकरी संघटनांची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. साखर व्यतिरिक्त कोणताही बायप्रॉडक्ट नसताना ३ हजार ६५३ रुपये दर दिल्याने जिल्ह्यातील इतर साखर कारखाने काय भूमिका घेतात याकडे पहावे लागणार आहे.
ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




