देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
![Petrol-diesel will be cheaper by another seven rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Petrol-1-1-1.jpg)
नवी दिल्ली – देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे. त्यातच देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 96.12 रुपये आहे तर डिझेलची किंमत ही 86.98 रुपये इतकी आहे.
देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. त्या ठिकाणी पेट्रोल हे 107 रुपये तर डिझेल हे 100.05 रुपये इतके आहे. तर शहरांचा विचार करता भोपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 104.29 रुपये पेट्रोलचा दर तर 95.60 रुपये इतका डिझेलचा दर आहे. महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.