गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची मोठी संधी

Gold Silver Price | गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सोने आणि चांदी खरेदी करणे सामान्य ग्राहकांसाठी खूप अवघड झाले होते. मात्र, आता गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत आणि मजबूत अमेरिकन डॉलरमुळे देशांतर्गत बाजारात या किमती लक्षणीयरीत्या खाली आल्या आहेत.
या घसरणीचा सर्वाधिक परिणाम चांदीच्या दरांवर दिसून आला असून, सर्व करांचा समावेश करून चांदीत सुमारे 9,000 रुपयांची मोठी घट झाली आहे. या घसरणीनंतर आता चांदीचा नवा दर प्रति किलो 2,56,500 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. शुक्रवारी देखील चांदीचा भाव याच पातळीवर नोंदवला गेला होता, जी ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
हेही वाचा : ‘धुरंधर’मधील ‘हवा हवा’ गाण्यासाठी मिळाले ४५ लाख? पाकिस्तानी गायकाचा दावा
सोन्याच्या किमतींमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट झाल्याचे चित्र बाजारात स्पष्टपणे दिसून आले आहे. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,950 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सर्व करांचा विचार केल्यानंतर सध्या सोन्याचा भाव अंदाजे 1,60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला जात आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये 17 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,770 रुपये, तर 22 कॅरेट 1,45,550 आणि 18 कॅरेटचा दर 1,19,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, पुणे आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोने 1,58,620 रुपये, 22 कॅरेट 1,45,400 आणि 18 कॅरेट 1,18,970 रुपयांवर उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये मात्र दर किंचित जास्त असून 24 कॅरेट सोने 1,59,820 आणि 22 कॅरेट 1,46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.





