भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी
टॅरिफ वॉर सुरू असतानाच कच्च्या तेलाच्या खरेदी संदर्भात भारताचा मोठा निर्णय

मुंबई : भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी आता अमेरिकेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र तरी देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे, दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला अमेरिकेनं एच -1 बी व्हिसावरील शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे, आता एच 1 बी व्हिसासाठी तब्बल एक लाख डॉलर म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत, याचा जगात सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. दरम्यान टॅरिफ वॉर सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.
भारत रशियासह अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करतो, यामध्ये आता आणखी एका देशाचं नाव जोडलं गेलं आहे. अजरबैजानने दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारताला तेलाची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरून वाद होता, हा वाद संपल्यानंतर आता दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा अजरबैजानकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. अजरबैजाननच्या सीमा शुल्क डेटानुसार ऑगस्ट 2024 मध्ये भारताला 1,747.07 टन कच्च्या तेलाची निर्यात करण्यात आली होती, या कच्च्या तेलाची किंमत जवळपास 7,81,520 डॉलर इतकी होती.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सामंजस्य करार
ऊर्जा सामंजस्य करार हा दोन्ही देशांमधील आर्थिक देवान -घेवाणीचा प्रमुख आधार आहे. 2024 मध्ये भारत हा अजरबैजानकडून पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा जगातील चौथा सर्वात मोठा खरीददार देश आहे. या काळात भारतानं अजरबैजानकडून 11.7 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली ज्याची किंमत जवळपास 72.9 कोटी डॉलर इतकी होती. तर 2022- 2023 या वर्षामध्ये भारत हा अजरबैजानकडून पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा खरेदीदार देश होता. भारतानं या काळात अजरबैजानकडून तब्बल 20 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. ज्याची किंमत जवळपास 1.6 अब्ज डॉलर इतकी होती.
भारताची गुंतवणूक
भारतानं केवळ अजरबैजानकडून तेलाची खरेदीच केलेली नाही तर, या देशात भारतानं मोठी गुंतवणूक देखील केलेली आहे. बाकूमध्ये असलेल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार भारताच्या ओएनजीसीएलने अजरबैजानच्या अजेरीज चिराग -गुनाशाली तेल आणि गॅस प्रकल्पामध्ये तब्बल 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.