कोरोना लढाईत भारताच्या मदतीसाठी अमेरिकेत ठराव मंजूर
![US approves resolution to help India in Corona battle](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/modi_biden_use.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेत ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजवला होता त्यावेळी भारताने अनेक औषधांवरील बंदी उठवून अमेरिकेला पुरवठा केला होता, त्याची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याचे म्हणत अमेरिकी प्रतिनिधीगृहाने भारताला कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मदत करण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. भारताला बायडन प्रशासनाकडून सुलभरित्या मदत मिळावी यासाठी हा ठराव करण्यात आला आहे.
भारतीय दबाव गटाचे सदस्य असलेले शेरमन व शॅबोट यांनी ४१ जणांच्या पाठिंब्याने हा द्विपक्षीय ठराव मांडला त्यात ३२ डेमोक्रॅटिक सदस्य होते तर ९ रिपब्लिकन सदस्य होते. ‘भारताचा औषध उद्योग हा कोरोना साथीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असून आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांना त्याचा लाभ होत आहे. भारत हा लशींचा मोठा उत्पादक देश असून त्यांनी एकूण ९३ देशांना ६६.३६ दशलक्ष मात्रा निर्यात केल्या होत्या. जगातील लस उत्पादनाच्या निम्मे उत्पादन भारतात होते. अमेरिका भारताच्या पाठीशी असून सामूहिक पद्धतीने काम करून आम्ही विषाणूवर मात करू’, असे ठरावात म्हटले आहे.
त्याचबरोबर शॅबोट यांनी सांगितले की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संकट काळात भारतानेच अमेरिकेला वैद्यकीय मदत केली होती. भारतात आता दुसरी लाट आली असून त्यातील रुग्णही कमी होत आहेत पण तरी यात भारताला अमेरिकेने मदत केली पाहिजे.’